आता तेंदूपत्ता मजुरांना रॉयल्टीचे ७२ काेटी बोनस; वन खात्याचा ऐतिहासिक निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 12:47 PM2022-08-26T12:47:38+5:302022-08-26T12:50:37+5:30
विदर्भातील जिल्ह्यांना सर्वाधिक लाभ
अमरावती : राज्याच्या वन विभागाला तेंदूपत्त्यापासून रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणारी ७२ कोटींची रक्कम आता मजुरांना बोनस स्वरूपात दिली जाणार आहे. आतापर्यंत केवळ १९ कोटी रुपये बोनसपोटी दिले जात होते, हे विशेष. या ऐतिहासिक निर्णयामुळे चांद्यापासून बांध्यापर्यंत तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या १ लाख ६० हजार कुटुंबांच्या जीवनात नवी आशा फुलणार आहे. विदर्भातील जिल्ह्यांना या निर्णयाचा सर्वाधिक आर्थिक लाभ होणार आहे.
वन विभागात तेंदूपत्त्यापासून रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणाऱ्या रकमेतून प्रशासकीय खर्च वजा करता उर्वरित रक्कम प्रोत्साहनार्थ मजुरी अर्थात बोनस म्हणून तेंदूपत्ता मजुरांना दिली जात होती. मात्र २०२२ पासून रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणारी रक्कम ही पूर्णपणे बोनसच्या स्वरूपात देण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. या निर्णयामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर होणारे अन्याय थांबणार आहे. एवढेच नव्हे तर ‘एजंटराज’ही संपुष्टात येणार आहे.
बुधवारी विधान परिषदेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेंदूपत्ता रॉयल्टीतून मिळणारी ७२ काेटींची रक्कम ही तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरूपात दिली जाईल, अशी घोषणा केली.
प्रशासकीय खर्चाला फाटा, तो केवळ मजुरांचा वाटा
२०२० मध्ये रॉयल्टीच्या स्वरूपात मिळालेली रक्कम ही प्रशासकीय खर्चापेक्षा कमी असल्यामुळे बोनस दिला नाही. २०२१ मध्ये १९.८७ कोटी रक्कम बोनसच्या स्वरूपात मजुरांना देण्यात आली. २०२२ मध्ये रॉयल्टीच्या स्वरूपात ७२ कोटी इतकी रक्कम जमा झाली. मात्र, यापुढे या रकमेतून प्रशासकीय खर्च न करता ही पूर्ण रक्कम मजुरांना बोनसच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. दरवर्षी १ मार्च ते १५ जून या कालावधीत तेंदूपत्ता संकलन केले जाते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने वनक्षेत्रात राहणाऱ्या तसेच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणाऱ्या तेंदूपत्ता संकलन मजुरांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. २०२१ चा तेंदूपत्ता बोनस येत्या दोन महिन्यात मजुरांना मिळेल. या निर्णयामुळे मजुरांना त्यांच्या श्रमाचा हक्क प्रदान करण्याचा आनंद आहे.
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
येथे केले जाते तेंदूपत्ता संकलन
चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, मेळघाट, अमरावती, गोंदिया, भंडारा, तळेगाव, आर्वी, आष्टी, कारंजा, काटोल, उमरेड, पारसिवनी, रामटेक, नांदेड, नाशिक, किनवट, माहूर, ठाणे, नंदूरबार, पालघर, धुळे.