जिल्हा परिषदेत ८०० शिक्षकांच्या आपसी बदल्या

By Admin | Published: June 14, 2016 12:06 AM2016-06-14T00:06:53+5:302016-06-14T00:06:53+5:30

काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया उशिरा का होईना मात्र शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

800 teacher interchanges in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत ८०० शिक्षकांच्या आपसी बदल्या

जिल्हा परिषदेत ८०० शिक्षकांच्या आपसी बदल्या

googlenewsNext

दुसरा दिवस : रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत बदली प्रक्रिया
अमरावती : काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया उशिरा का होईना मात्र शिक्षण विभागाने सुरू केली आहे. बदली प्रक्रियेच्या १३ जून या दुसऱ्या दिवशी शिक्षण विभागाने मेळघाटातील ८०० शिक्षकांच्या आपसी बदलीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यात अनेक शिक्षकांनी सोईच्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठी सायन्सस्कोअर शाळेत एकच गर्दी केली होती. यामध्ये भाषा शिक्षकांच्या २६ तर ३० उर्दू माध्यमाच्या बदल्याचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या मागील काही वर्षांत विविध तांत्रिक कारणांमुळे रखडल्या होत्या. रविवार १२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रशासकीय बदल्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या सोमवारी आपसी बदल्यांची समुपदेशनाव्दारे बदली प्रक्रिया राबविली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. यामध्ये विषय शिक्षकांच्या २६ बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मेळघाटातीन २६ शिक्षकांना सपाटीवर आणण्यात आले आहे. तेवढेच शिक्षक मेळघाटात पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बदली प्रक्रियेत आपसी बदल्यांची मागणी करणाऱ्या शिक्षकांची संख्या ३७४ एवढी आहे. याप्रमाणे दुप्पट शिक्षकांची संख्या लक्षात घेता हा आकडा ७४८ शिक्षकांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. यात मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र या विषय शिक्षकांच्या बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे.यावेळी बदली प्रक्रियेत डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, शिक्षण विभागाचे अधीक्षक संजय राठी, पकंज गुल्हाने, तुषार पावडे, ऋषिकेश कोकाटे, श्याम देशमुख, अविनाश भगत, राजू झाकडे, दिनेश बांबल, सुनील सातपुते आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
शिक्षण विभागाने राबविलेल्या बदली प्रक्रियेत मुख्यध्यापकांना डावलून केली जात आहे. याशिवाय केंद्रप्रमुखांवर या बदल्यांमध्ये अन्याय करण्यात आला आहे. ज्यांनी मेळघाटात सेवा दिली आहे, त्यांनाच पुन्हा मेळघाटात पाठविले आहे, हा अन्याय आहे. मेळघाटातील शिक्षक सपाटीवर आले पाहिजे, ही बाब चांगली आहे. मात्र शिक्षण विभागाची बदलीची प्रक्रिया ही योग्य वाटत नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुकडे यांनी व्यक्त केले. सलग दोन दिवस शिक्षकांच्या प्रशासकीय आपसी बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत राबविली गेली. मात्र अचानकच या सर्व प्रक्रियेला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिली असल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांचा मात्र ऐनवेळी हीरमोड झाला. त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत न्यायासाठी काही शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 800 teacher interchanges in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.