अमरावती महापालिकेत आयुक्तपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ; नवनियुक्त कापडणीसांनी पदभार स्वीकारला
By गणेश वासनिक | Published: March 15, 2024 07:48 PM2024-03-15T19:48:28+5:302024-03-15T19:49:15+5:30
महानगरपालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून ‘राज’कारण सुरू झाले आहे.
अमरावती: महानगरपालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून ‘राज’कारण सुरू झाले आहे. आयुक्त देवीदास पवार यांची गुरुवारी नगरविकास विभागाने बदलीचे आदेश जारी केले, तर नवे आयुक्त म्हणून नितीन कापडणीस यांच्याकडे अमरावती महापालिकेची धुरा सोपविली. मात्र देवीदास पवार यांची अचानक झालेली बदली त्यांच्या जिव्हारी लागली आणि शुक्रवारी त्यांनी ‘मॅट’मधून स्थगनादेश आणला. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारला असला तरी ‘मॅट’च्या निर्णयामुळे ‘आ अब लौट चले’, असे चित्र आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नितीन कापडणीस यांची गुरुवारी नगरविकास विभागाने नियुक्ती केली आहे. कापडणीस हे मुंबई येथील नगर परिषद प्रशासन संचालनालयात उपायुक्तपदी कार्यरत होते. मात्र आयुक्त देवीदास पवार यांना १४ मार्चपासून कार्यमुक्त होण्याचे आदेश होते. पवार यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असे शासन आदेशात नमूद होते. मात्र पवार यांनी शासन आदेशाला आव्हान देत शुक्रवारी ‘मॅट’मधून तीन आठवड्यांसाठी बदलीला स्थगनादेश मिळवला आहे. ‘मॅट’च्या आदेशामुळे देवीदास पवार हे अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी पुढील आदेशापर्यंत कायम राहतील, अशी माहिती आहे.
‘मॅट’चा निर्णय आणि शासन आदेशाचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे. अमरावतीत काहीतरी चांगले काम करण्याची इच्छा होती. भानगड करणे हे माझ्या स्वभावात नाही. जो काही निर्णय होईल, ते मान्य असेल. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला असला तरी ‘मॅट’च्या निर्णयामुळे मी परत जात आहे. - नितीन कापडणीस, नवनियुक्त आयुक्त, अमरावती महापालिका