अनिल कडू
परतवाडा : अचलपूर शहरात जाणाऱ्या तहसीलमागील मार्गावर नाल्यात, शनिवारी अचानक महागडे मासे निघायला लागले. याची माहिती मिळताच, नागरिकांनी एकच धूम केली. यात मोठ्या प्रमाणात ते मासे नागरिकांच्या हाती लागले. काहींनी तर मासोळी पकडण्याचा मनसोक्त आनंद घेतला. यात आबालवृद्धांनी सहभाग दर्शविला. दरम्यान बघ्यांचीही मोठी गर्दी उसळली होती.
हाती लागलेले मासे मरळ प्रजातीचे असून, याला चारशे रुपये प्रति किलो दर असल्याचे मासेमारांनी सांगितले. कुणी गळ लावून, तर कुणी प्लास्टिकच्या पिशवीत, पोत्यात मासे पकडत होते.
या नाल्याच्या दोन्ही बाजू नगरपरिषदेने बांधल्या आहेत. नाल्याच्या दोन्ही भिंतींवर उभे राहून लोक पाण्यातून मासे काढत होते. एरवी हा नाला सांडपाणी वाहून नेणारा असून, या नाल्यात शनिवारी पावसाचे पाणी वाहत होते. या नाल्यात मासे कुठून आणि कशा आल्यात, याविषयी तर्क-वितर्क लावले जात होते. अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा आणि सपन प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. या पाण्यासोबतच धरणातील मासे बाहेर पडत आहेत. ज्या नाल्यात हे मासे निघाले, तो नाला पुढे बिच्छन नदीला मिळतो. या नदीचे सपन नदीसोबत कनेक्शन जुळते. त्यामुळे सपन प्रकल्पातील ते मासे असल्याचे बोलले जात आहे.
दि.24/7/21 फोटो मासोळी पकडल्यानंतर चा