जैन संघटनेचा पुढाकार : मेळघाटातील विद्यार्थ्यांचा समावेशअमरावती : भारतीय जैन संघटना अमरावती शाखेच्यावतीने सोमवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी, आदिवासी कुटुंबांतील मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांना पुण्याच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात रवाना करण्यात आले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, अतिरिक्त जिल्हाधिकारी के.आर. परदेशी, एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, अभिनंदन बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भारतीय जैन संघटनेच्या नियोजन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुदर्शन जैन, गोविंद कासट, पुष्पा बोंडे, प्रदीप रुणवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतीय जैन संघटनेच्यावतीने पाहुण्यांचे वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकातून सुदर्शन जैन यांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्याचा आलेख मांडला. जैन संघटनेचे सर्वेसर्वा शांतीलाल मुथा यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरीची पायाभरणी केली असून हाच वसा पुढे चालविण्याचा मानस व्यक्त केला. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी भारतीय जैन संघटनेचे कार्य वाखाणण्याजोगे असून कुठल्याही लालसेची अपेक्षा न ठेवता पीडित, शोषितांसाठी ही संघटना सदैव कार्यरत आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित करुन त्यांना रोजगाराचा मार्ग दाखवून दिला ही बाब अविस्मरणीय आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी देखील भारतीय जैन संघटनेच्या कार्याची भरभरून स्तुती केली. शैक्षणिक पुनर्वसनासाठी चाललेल्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी इतरही मान्यवरांनी जैन संघटनेच्या कार्यावर कौतुकाचा वर्षाव केला. संचालन ज्योती तोटेवार यांनी केले. (प्रतिनिधी)दिव्या म्हणाली, आईचं स्वप्न पूर्ण करेल!वडिलांनी आत्महत्या केली. मात्र मी खचून जाणार नाही. इंजिनिअर बनून आईचं स्वप्न पूर्ण करणार, अशी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थिनी दिव्या धोनवाडे ही मनोगत व्यक्त करताना म्हणाली. दिव्या ही पुढील शिक्षणासाठी पुणे येथे जात आहे. तिने आईचा साथ न सोडण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त, आदिवासी कुटुंबांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन
By admin | Published: June 14, 2016 12:06 AM