अमरावती : सिटी कोतवाली ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक दारू पकडण्यास गेले असता त्यांच्याशी हुज्जत घालून दोघांनी लोटलाट केली व दोन अज्ञात इसमाच्या माध्यमातून घटनास्थळाहून दारू पळवून नेली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना श्याम चौकातील कलिंगा बार समोर बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी गुरूवारी गुन्हा नोंदविला.
नेत्रपाल यशपाल कुकरेजा (५१, रा. दस्तुरनगर), सुरेंद्र गुरुमुख खत्री(६०, रा. दस्तुर नगर अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध भादविची कलम ३५३, १८६, १०९, ५०४, १८८, ३४ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी पीएसआय ज्ञानेश्वर रमेश कायंदे (३३, रा. कोतवाली ठाणे) यांनी पोलिसांच्यावतीने तक्रार नोंदविली.
पोलीससूत्रानुसा पीएसआय ज्ञानेश्वर कायंदे हे राजकमल चौक येथे फिक्स पाॅईंटवर कर्तव्यावर असताना कलिंगा बारसमोर एका दुचाकीवर तोंडाला मासक न लावता दोन अनोळखी इसम उभे होते. त्यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता उडावाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता त्यांच्याकडे अवैध दारू आढळून आली. मात्र, ही दारू आरोपीने दोन अनोळखी इसमाच्या माध्यमातून पळवून लावली. पीएसआय यांच्याशी हुज्जत घालून त्यांना लोटलाट केले. तसेच शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदविली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले करीत आहेत.