जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्त, संचालक मंडळ बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:15 AM2021-02-25T04:15:58+5:302021-02-25T04:15:58+5:30
अमरावती : दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने बरखास्त करण्यात आले. आता बँकेचे नवे ...
अमरावती : दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने बरखास्त करण्यात आले. आता बँकेचे नवे प्राधिकृत अधिकारी नागपूर येथील वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त सतीश भोसले हे असतील, असा आदेश राज्याच्या सहकार आयुक्तांनी बुधवारी जारी केला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि सहकार आयुक्तांच्या आदेशाने विद्यमान बँकेच्या संचालक मंडळावर गंडातर आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०१५ रोजी संपुष्टात आली. तत्पूर्वी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० च्या कायद्यातील कलम ९७ च्या घटना दुरुस्तीनुसार संचालक मंडळाने उपविधी दुरिस्ती करून घेणे अपेक्षित होते. मात्र. उपविधी दुरूस्त न करता मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल करुन पुढील सहा वर्षांसाठी मुदत संपल्यानंतरही संचालक मंडळांनी कारभार चालविला. या सहा वर्षात झालेले निर्णय, शेतकऱ्यांवर अन्याय, आर्थिक गैरव्यवहाराबाबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कलम ७९ अंतर्गत व इतर कलमाखाली सुमारे १९ वेळा मध्यवती बँकेच्या संचालक मंडळाला नोटीस बजावली आहे.
------------------
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासक नियुक्त
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या एककल्ली कारभाराविरुद्ध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सुरेश विधाते, नंदकिशोर वासनकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून न्याय मागितला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी आदेशाद्धारे संचालक मंडळ बरखास्त करून राज्य शासनाने प्रशासक नेमण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार बुधवारी बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.
----------------------------
कोरोना काळात आमसभा कशा?
सर्वोच्च न्यायालयाने बँकेचे नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य कोणतीही कामे अथवा निर्णय घेऊ नये, असे आदेशित केले होते. असे असले तरी कोरोना काळात बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांनी आमसभा घेतल्या आहे. शेतकऱ्यांच्या ऑनलाईन सभा घेतल्याचा देखावा करण्यात आला. परंतु, कोरोना काळात आमसभा घेतल्या कशा? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. कोरोना काळात झालेल्या आमसभा या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करणाऱ्या ठरल्या आहे.
-----------------------
पात्र शेतकऱ्यांचे कर्ज नाकारले
जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात अनेक पात्र शेतकऱ्यांनी पीककर्जाची रीतसर मागणी केली असता, त्यांना पीककर्ज नाकारले, असा आक्षेप घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी भविष्यातील निवडणूक लक्षात घेता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत अचलपूर, चांदूरबाजार व दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सहकार खात्याने चौकशी करून पीककर्ज वाटपात अनियमितता झाल्याचे स्पष्ट केले आहे.
----------------
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची अशी आहे मागणी
- बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करावी
- मतदानाचा हक्क पात्र शेतकऱ्यांना मिळावा
- बँकेच्या पैशाची नियमबाह्य गुंतवणूक तपासावी
- नोकर भरती, संगणकीकरणावर अमाप खर्चाची चौकशी व्हावी
------------------------
बुधवारी बँकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून कारभार स्वीकारला आहे. येत्या सहा महिन्यांत नवीन संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येईल.
- सतीश भोसले, प्राधिकृत अधिकारी, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक