अमरावती : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश (एनईईटी - नीट) परीक्षेत उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (एलएफयू) ही स्वयंसेवी संस्था मेळघाटात कार्यरत आहे. यामुळेच अनेक अतिशय दैनावस्थेत खितपत पडलेल्या आदिवासी कुटुंबातील मुलांना वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी पात्र होता आले. यंदा धारणी तालुक्यातील सावन शिळसारकर (रा. घोटा) या युवकाने नीट उत्तीर्ण केली आहे.
मेळघाटातील दुर्गम गाव असलेल्या घोटा येथील सावनचे आई व वडील वेगळे राहतात. आई आजारी असते. सावन आपल्या वडिलांसोबत राहतो. वडील शेतमजुरी करतात, तेव्हा कुठे त्यांना १०० ते १५० रुपये मिळतात. त्यातूनच घरचा गाडा चालतो. धाकटा भाऊ अकरावीला आहे. सावनने धारणीजवळील आश्रमशाळेतून दहावी पूर्ण केली. प्रथम त्याला अभ्यासात रुची नव्हती. कारण घरातील हलाखीची परिस्थिती त्याला मजुरीसाठी खुणावत होती. पण, ‘एलएफयू’ने त्याला अंतर्बाह्य बदलविले. परिस्थितीशी लढा देत त्याने अभ्यास कायम ठेवला.
लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट
गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्यासाठी २०१५ साली लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटची स्थापना पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली. सुरुवातीला पुण्यातील शासकीय महाविद्यालयांमधील अकरावी आणि बारावीच्या मुलांना कोचिंग दिले जात असे. आता चार वर्षांपासून स्वतंत्रपणे नीटच्या विद्यार्थ्यांना कोचिंग दिले जाते. आता ४० पेक्षा जास्त विद्यार्थी कोचिंग घेत आहेत.
अशी होते निवड
दहावीनंतर प्रवेश परीक्षा व मुलाखत होते. त्यातून मुले निवडली जातात. विदर्भासाठी भामरागड येथे आमचे काही वरिष्ठ डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी दर आठवड्याला जाऊन लेक्चर देतात. काही लेक्चर ऑनलाईन होतात. बरेच विद्यार्थी ज्यांनी ‘एलएफयू’कडून कोचिंग घेतलं आहे, ते आता ‘एलएफयू’मध्ये कोचिंग देतात.
मेडिकल एन्टरन्स कोचिंग कोट्यवधी रुपयांची इंडस्ट्री बनली आहे. अनेकजण प्रायव्हेट कोचिंग घेऊ शकत नाहीत. मग त्यांनी डॉक्टर बनायचे स्वप्न सोडायचे का? अशा मुलांसाठी आम्ही एलएफयूची स्थापना केली. गरीब आणि गरजू विद्यार्थी ज्यांना डॉक्टर बनायचे आहे, त्यांना फ्री कोचिंगचे व्यासपीठ आम्ही दिले आहे.
- डॉ. अतुल ढाकणे, अध्यक्ष, एलएफयू
--------------