अमरावती : पावणेदोन कोटींचा कर बुडवून व्यापा-याचा पोबारा, राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 09:08 PM2018-01-13T21:08:28+5:302018-01-13T21:08:31+5:30
पावणेदोन कोटींचा कर बुडवून व्यापा-याने पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी शहरात उघडकीस आला.
अमरावती : पावणेदोन कोटींचा कर बुडवून व्यापा-याने पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी शहरात उघडकीस आला. विक्रीकर अधिका-यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी नीलेशकुमार गोपालदास सहजवानी (रा. विश्वकर्मानगर, इंदूर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०, (ब), महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा कलम ७४१ (बी), ७४१ (अ), (आय), ७४ (२), ७४३ (एम) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी नीलेश सहजवानी याने अमरावतीमधील रविनगरात स्वस्तिक एन्टरप्रायझेस नावाने कार्यालय उघडले होते. त्याने स्वस्तिक एन्टरप्रायझेस नावाने विक्रीकर विभागात नोंदणी केली. तेलबियांसह अन्य काही वस्तूंची खरेदी व विक्री करताना त्याने संबंधित ग्राहकांकडून कर वसूल केला. मात्र, त्या आर्थिक व्यवहारानुसार आरोपी नीलेश सहजवानी याने विक्रीकर विभागाकडे पैसे भरले नाहीत तसेच सन २०१३, १४ व १५ मध्ये १४ कोटी २९ लाख १३ हजार ६७५ रुपयांची उलाढाल लपविली. या रकमेवरील ६९ लाख ६९ हजार १२८ रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत भरला नाही. एकंदर नीलेशकुमारने १ कोटी ७३ लाख २१ हजार ९४५ रुपयांचा कर न भरता अपहार केला. हा गंभीर प्रकार विक्रीकर विभागाच्या लक्षात येताच, महिला अधिका-याने राजापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानुसार नीलेशकुमार सहजवानीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
रविनगरातील कार्यालयाला कुलूप
पोलिसांनी नीलेशकुमार याच्या रविनगरातील कार्यालयाची पाहणी केली असता, ते बंद आढळले. त्याने शासनाची फसवणूक करून पोबारा केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक लवकरच इंदूरला जाणार आहे.
आरोपीने स्वस्तिक एन्टरप्रायझेसचे कार्यालय थाटून तेलबियांसह अन्य काही वस्तूंची खरेदी-विक्री केली. मात्र, पैसा गोळा करून शासनाकडे कर भरला नाही. त्यानुसार विक्रीकर विभागाच्या अधिकाºयांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अरुण मेश्राम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, राजापेठ ठाणे.