अमरावती : मुद्दल वगळली, यंदा व्याजाचीच वसुली ; चाकर्दा गाव पंचायतचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 06:21 PM2018-03-08T18:21:03+5:302018-03-08T18:21:03+5:30
मेळघाटातील गाव पंचायत बँकांनी यंदा वाटलेल्या कर्जाची वसुली करताना मूळ रक्कम वगळून केवळ त्यावरील व्याजाचीच रक्कम वसूल करण्याचा निर्णय चाकर्दा या गावातील पंचायतने घेतला आहे.
-श्यामकांत पाण्डेय
धारणी (अमरावती) : मेळघाटातील गाव पंचायत बँकांनी यंदा वाटलेल्या कर्जाची वसुली करताना मूळ रक्कम वगळून केवळ त्यावरील व्याजाचीच रक्कम वसूल करण्याचा निर्णय चाकर्दा या गावातील पंचायतने घेतला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यांमध्ये गावपाड्यातील पंचायत व्यवस्था सर्वत्र परिचित आहे. या पंचायतींचे वार्षिक ताळेबंद पंचमीदरम्यान सादर करण्यात येत आहे. या पंचायतद्वारे वाटण्यात आलेल्या रकमेवर सवाई व्याजदराने वसुली दरवर्षी करण्यात येते. त्यामुळे पंचायतकडे जमा रकमेत दरवर्षी एक चतुर्थांश रकमेने वाढ होत जाते. मात्र, यंदा गावकºयांची आर्थिक परिस्थिती पाहता, एकूण रक्कम न वसूल करता, केवळ मूळ रकमेवरील व्याजाचीच वसुली करण्याचा निर्णय चाकर्दासह अनेक गावांतील पंचायतींनी घेतला आहे.
होळी सणानंतर रोजगाराच्या रकमेतून गाव पंचायतींची रक्कम भरण्यासाठी बाहेरगावावरून आदिवासी बांधव मूळ गावी परतले आहेत. यंदा मूळ रक्कम वसूल न करण्याचा निर्णय पंचायतने घेतल्याने आदिवासींच्या होळीच्या आनंदात भरच पडली आहे.