अमरावतीच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:44 AM2019-05-23T00:44:34+5:302019-05-23T00:45:02+5:30
लोकसभा मतदारसंघाची मतगणना गुरूवारी सकाळी ८ वाजता नेमाणी गोडाऊनमध्ये सुरू होईल. मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचे मतदान ४० मिनिटांत जाहीर होण्याची शक्यता असल्याने निकालाचा ट्रेंड स्पष्ट होणार आहे. रात्री उशिरा जाहीर होणारा निकाल येत्या विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक व जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा मतदारसंघाची मतगणना गुरूवारी सकाळी ८ वाजता नेमाणी गोडाऊनमध्ये सुरू होईल. मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचे मतदान ४० मिनिटांत जाहीर होण्याची शक्यता असल्याने निकालाचा ट्रेंड स्पष्ट होणार आहे. रात्री उशिरा जाहीर होणारा निकाल येत्या विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक व जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार व एक नोटा असे एकूण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत झाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे व बहुजन समाजवादी पक्षाचे अरुण वानखडेदेखील दखलपात्र मतदान घेतील, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.
सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मेळघाट मतदारसंघात सर्वाधिक ६९.९७ मतदान झाल्याने आदिवासी बांधवांचा कौल कुणाला, हादेखील महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. आनंदराव अडसूळ हे दोन टर्मपासून या मतदारसंघाचे खासदार आहेत. अनुभव ही त्यांची जमेची बाजू आहे. पराभव झाल्यानंतरही मतदारसंघातील प्रत्येक गावांत संपर्क ठेवणाºया उमेदवार अशी ओळख नवनीत राणांनी निर्माण केली. आमदार रवि राणांची राजकारणातील जाण ही नवनीत यांची आणखी एक जमेची बाजू. या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत कायम असलेल्या सस्पेंसचा पडदा उद्या उघडला जाणार आहे.