- प्रदीप भाकरे अमरावती : थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या दोन मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, त्या सिल करण्यात आल्या. रामपुरी कॅम्प झोनमधील जैन सुपर शॉप व वलगाव रोडवरील शेषराव शंकरराव सोनार या मालमत्तांवर ती कारवाई करण्यात आली. दोघांकडे सुमारे तीन लाख रुपये थकीत होते. पाचही झोनमध्ये ही जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनात उत्तर झोन क्र.१ रामपुरी कॅम्प येथील पथकामार्फत मोठ्या प्रमाणात थकीत कर असलेल्या मालमत्तांना सिल करुन महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांनी त्वरित थकीत मालमत्ता कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहाय्यक पुसतकर यांनी केले आहे. मालमत्ता धारकांना यापुर्वी वेळोवेळी भेटी देवून थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत व तदनंतर नोटीस सुध्दा देण्यात आल्या. त्यांना मुदत देखील देण्यात आली. मात्र, त्या मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास अशांच्या मालमत्ता सिल करण्यात येवून महानगरपालिका त्या ताब्यात घेण्यात येणार आहे. दरम्यान मार्च एन्डिंगच्या अनुषंगाने मालमत्ताधारकांनाही नोटीसा दिल्या जात आहेत. फिरत्या पथकाद्वारे दारोदारी जाऊन मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक क्षेत्रिय अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव, कर निरीक्षक संजय खडसान, भागीरथ खैरकर, सुनिल वर्मा, राजेश जोंधळे, रोशन कांबे, मो. इकबाल, सै. मजहर अली व इतर कर्मचारी उपस्थित होते.
तर २५ टक्के सुटमालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत आपल्या मालमत्ता कराची थकीत रक्कम अधिक ७५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांना दंडात्मक रक्कमेवर २५ टक्के सूट मिळणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या निर्देशानुसार शनिवार व रविवारी देखील मालमत्ता कर भरणा शिबिर होणार आहे.
ऑनलाईन भरा करज्या मालमत्ता धारकाने मालमत्ता कर भरला नसेल त्यांनी त्वरीत मालमत्ताकर भरुन महानगरपालिकेला सहकार्य करावे. जे मालमत्ता धारक मालमत्ता कर भरणार नाही, त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही होणार आहे.महानगरपालिकेच्या www.amravaticorporation.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकींग, एनईएफटी, आरटीजीएस याव्दारेही कराचा भरणा नागरिकांना करता येईल.