लग्नाचा वाढदिवस (पश्चाताप दिन) साजरा करण्यासाठी सुट्टी हवीय! पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:45 AM2022-03-31T07:45:36+5:302022-03-31T07:48:06+5:30
पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज सोशल मीडियावर तुफान व्हायरल
अमरावती: पोलीस कर्मचाऱ्यानं सुट्टीसाठी केलेला अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विनोद राठोड असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात ते अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. २९ मार्च रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यासाठी त्यांनी त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मागितली. या सुट्टीसाठी त्यांनी वरिष्ठांना अर्ज केला. हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला.
राठोड यांना २७ मार्चला साप्ताहिक सुट्टी देण्यात आली होती. मात्र २९ मार्चला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यानं त्यांनी सुट्टीचा दिवस बदलण्याची मागणी करणारा अर्ज वरिष्ठांना दिला. २९ मार्चला लग्नाचा वाढदिवस असल्यानं २७ मार्चची साप्ताहिक सुट्टी २९ मार्चला बदली करून द्यावी, असं राठोड यांनी अर्जात म्हटलं. अर्जात लग्नाचा वाढदिवस नमूद करताना त्यांनी त्यापुढे कंसात पश्चाताप दिन असा उल्लेख केला. त्यामुळेच हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सरकारी नोकरीत असलेले कर्मचारी त्यांच्या वरिष्ठांकडे सुटीसाठी अर्ज करतात. सुटीचं कारण ते आपल्या अर्जात नमूद करतात. अमरावतीमधल्या मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार राठोड यांनीदेखील तेच केलं. लग्नाच्या वाढदिवसाचा उल्लेख त्यानं थेट पश्चाताप दिन म्हणून केल्यानं पोलीस अधिकारी चांगलेच चक्रावून गेले. राठोड यांच्या अर्जाची पोलीस ठाण्यात बरीच चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.