अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित; ७ ऑक्टोबरनंतर पुढील दिशा ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 10:22 PM2020-10-01T22:22:02+5:302020-10-01T22:22:18+5:30
अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारत विद्यापीठाचे प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला
अमरावती : २४ सप्टेंबरपासून सुरू असलेले अकृषी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन बुधवार, ७ ऑक्टोबरपर्यंत तूर्त स्थगितीचा निर्णय सेवक संयुक्त कृती समितीने घेतला. त्यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनास ब्रेक लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीनंतर हा सकारात्मक निर्णय कर्मचारी संघाने घेतला आहे.
अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारत विद्यापीठाचे प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. आता विद्यापीठाचे कामकाज ३ ऑक्टोबरपासून सुरू होतील. विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष अजय देशमुख, भैय्यासाहेब भारंबे, बाळासाहेब यादगिरे, मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष नितीन कोळी, ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशीकांत रोडे, महासचिव विलास सातपुते आदींनी संबोधित केले. दरम्यान आंदोलनस्थळी आ. बळवंत वानखडे, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ. सी.रघुवंशी आदींनी भेटी दिल्या. यावेळी बळवंत वानखडे यांनी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या समस्या मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.