लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मानांकन दर्जा घसरला आहे. २०१६ साली ‘ए’ प्लस असताना आता ‘बी’ प्लस श्रेणीवर समाधान मानावे लागले. ९ ते ११ ऑगस्ट या दरम्यान ‘नॅक’ पिअर चमुने विद्यापीठाचे मू्ल्यांकन केले असून, तसा वस्तुनिष्ठ अहवाल वजा दणका दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार कसा सुरू आहे, हे स्पष्ट होते. (Amravati University gradation dropped)
तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी अविनाश मोहरील यांच्याकडे ‘नॅक’संदर्भातील मोठी जबाबदारी सोपविली होती. मात्र मोहरील यांनी घेतलेल्या पुढाकारावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. विद्यापीठाला याआधीच्या मुल्यांकनात नॅकने सीजीपीए ३.०७ सह ‘अ’दर्जा बहाल केला होता. मात्र, यंदा ‘नॅक’ने विद्यापीठाच्या गुणदानात मोठी घट करून केवळ २.९३ एवढाच पॉईंटर दिल्याने बी प्लस दर्जावर समाधान मानावे लागले.
दर्जा घसरला, जबाबदारी कुणाची?
काही अधिकाऱ्यांच्या शहाणपणामुळे विद्यापीठाला पुढील पाच वर्षांसाठी ‘बी’ प्लस दर्जावर कायम राहावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्याचे देखील भविष्यकालीन नुकसान गलथान काराभारामुळे झाले आहे. खालावलेला शैक्षणिक स्तर आणि ‘नॅक’समोर भूमिका मांडण्यात पडलेली कमतरता याला नेमके जबाबदार कोण याचा शोध विद्यापीठ घेणार का? संबंधितांवर चौकशी नेमणार का ? असा प्रश्न सध्या विद्यापीठ वर्तुळात चर्चिल्या जात आहे.
अतिशहाणपण नडले
विद्यापीठात नॅक समितीचे आगमन होण्यापूर्वीपासून नॅकशी संबंधित खरेदी आणि अन्य बाबींचे कंट्रोल एकछत्री होते. कमी खर्च आणि ज्यादा दिखाऊपणाच्या नादात विद्यापीठाला फटका बसला आहे. वरिष्ठांना डावलून नवख्या अधिकाऱ्यांकडे कारभार गेल्याने विद्यापीठाला देखील ‘बी’ प्लस दर्जावरच समाधान मानावे लागले आहे.
परीक्षा प्रणाली, रिसर्चवर ठपका
विद्यापीठाकडे स्वत:ची ऑनलाईन परीक्षा प्रणाली नाही. ऑनलाईन परीक्षांचे संचलनात अपयशी ठरल्याची नोंद ‘नॅक’ने घेतली आहे. प्राध्यापकांची कमतरता, शैक्षणिक सुविधांचा अभाव या बाबी देखील अधोरेखीत केलेल्या आहेत. विशेषत: अनेक विभागांमध्ये संशोधन नावालाही आढळले नाही. रिसर्च पेपर आणि संशोधनाशी निगडीत अनेक बाबीत विद्यापीठ माघारल्याचे नॅक’ने नोंदविले.
गतवेळी विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘ए’ प्लस श्रेणी होती. आता ‘बी’प्लस श्रेणी मिळाली आहे. संशोधन व विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीवर ‘नॅक’ चमुने बोट ठेवले, ही बाब चिंतनीय आहे. कुठे चुकले याविषयी मूल्यांकन करावे लागेल.
- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ