अमरावती : परतीच्या पावसाने तीन एकरातील सोयाबीन मातीमोल झाले. शेतीपिकांचा पंचनामाही झाला नसल्याने नांदगाव तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे बुधवारी ही घटना घडली. संतप्त नातेवाइकांनी अमरावती येथे गुरुवारी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह जिल्हा कचेरीत आणल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.
सुधाकर महादेवराव पाटेकर (४८, रा. सिद्धनाथपूर, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातील उभे पीक सडल्याने त्यांनी आत्महत्या केली. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे झाले नाही. पटवारी, ग्रामसेवक शेतात आले नाही, असा आरोप मृताचे भाऊ संतोष पाटेकर, जावई देविदास खाडे, शेजारी प्रशांत भागेवार, मोहन पवार, विजय पाटेकर आदींनी अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांना निवेदन देताना केला. या कुटुंबाला सावरण्यासाठी तात्काळ आर्थिक मदतीची मागणी यावेळी करण्यात आली.
वडिलांना कॅन्सर झाल्याने त्यांच्या उपचारासाठी सुधाकर पाटेकर कर्जबाजारी झालेत. वडिलांनी आत्महत्या केली. यातून सावरत नाही तोच त्यांच्या आईचेदेखील निधन झाले. महिनाभराच्या आत कोसळलेले संकट व शेतीखर्च यात पाटेकर कर्जबाजारी झालेत. नातेवाइकांकडून उसनवार केली. महाराष्ट्र बँकेचे व गावातील सेवा सहकारी सोसायटीचे दोन लाखांवर कर्ज त्यांच्यावर आहे. तीन मुली व एका मुलाचे शिक्षण, लग्न कसे करावे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी विषारी कीटकनाशकाचे सेवन केले. यात त्यांचा मृत्यू झाला. हा अमरावती जिल्ह्यातील ओला दुष्काळाचा पहिला बळी ठरला आहे.