अमरावती : सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर आहे. या निवडणुकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका विजयी झाल्यास त्यांना या मानधनाच्या पदापासून वंचित राहावे लागणार आहे. राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने याविषयी स्पष्ट सूचना निवडणूक विभागास दिल्या आहेत.
एकात्मिक ग्राम विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रासाठी मंजूर असलेली अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ही मानधनाची पदे आहेत. शासकीय कर्मचारी नसल्यामुळे या मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ते विजयी झाल्यानंतर मानधनी पदावर गैरवर्तन केल्यास किंना अनुपस्थित राहत असल्यास अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणे शक्य होत नाही. त्याचा विपरित परिणाम एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सेवांवर होत असल्याचे या विभागाने सांगितले.
बाॅक्स
राजीनामा किंवा सक्तीने सेवेतून कमी
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर व विजयी पद स्वीकारल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांकडून मानधनाच्या पदाचा राजीनामा घेण्यात यावा. राजीनामा न दिल्यास त्यांना मानधनाच्या सेवेतून सक्तीने कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.