जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाडींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:39 PM2017-12-31T23:39:48+5:302017-12-31T23:41:06+5:30
अंगणवाडी बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून इमारतीची कामे केली जाणार आहेत.
जितेंद्र दखने।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अंगणवाडी बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून इमारतीची कामे केली जाणार आहेत. अंगणवाडी शौचालय बांधकामे व अंगणवाडी इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीच्या कामांना शासनाने परवानगी दिली आहे. इमारत उभारण्यासाठी शासनाच्यावतीने जिल्हा वार्षिक निधीतून ४ कोटी २३ लाख ६० हजारांची मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेमधून अंगणवाडी बांधकामासाठी लेखाशीर्ष उपलब्ध नसल्यामुळे निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी अडचणी येत होत्या. दरम्यान, शासननिर्णयामुळे सन २०१७-१८ पासून अंगणवाडी बांधकामासाठी राज्यस्तरावर ४ कोटी २३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच केंद्र शासनाकडून इमारत बांधकामासाठी ६० टक्के आणि राज्य शासनाच्या ४० टक्के निधीद्वारा कामास प्राधान्य देण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणानुसार जिल्हा वार्षिक निधीतून नवीन अंगणवाडी बांधकामाबरोबरच जुन्या अंगणवाड्यांमध्ये शौचालय नसणाऱ्या ठिकाणी शौचालयाची कामे तातडीने करण्यात येणार आहे. न्
ावीन अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी शौचालय, इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीच्या सुधारणेस मान्यता देण्यात आली आहे. अंगणवाडी दुरुस्ती तसेच ज्या अंगणवाडीमध्ये शौचालय नाही, अशा ठिकाणी बांधकामासाठी ५० टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, जि.प. महिला व बालविकास अधिकारी यांच्या मान्यतेने अंगणवाडी बांधकामासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधीतून ५० टक्के प्रमाणे विभागणी करून घेणयत येणाºया कामाचा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेण्यात यावा तसेच वित्तीय वर्ष संपण्याचा कालावधी विचारात घेऊन तातडीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने दिल्या आहेत.
ज्या अंगणवाड्यांंमध्ये शौचालये नाहीत, अशा ठिकाणी शौचालयाची बांधकामे प्राधान्याने घ्यावीत, अंगणवाडी इमारतीमधील किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, ही कामे करताना शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून अंगणवाडीचे कामे मंजूर करावे, अशा स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. अंगणवाडी केंद्राच्या किरकोळ दुरुस्ती व शौचालयाची कामे करण्याबाबत शासनाचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार शासननिर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अमरावती जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कै लास घोडके यांनी सांगितले.
बंद शौचालय सुरू होणार
शासनाच्या नवीन निर्णयामुळे जिल्हा वार्षिक निधीतून (डिपीसी) अंगणवाडी केंद्राची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच शौचालय दुरुस्ती आणि किरकोळ दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध झाला आहे. परिणामी वर्षानुवर्षे दुरुस्तीअभावी रखडणाऱ्या अंगणवाड्या सुस्थितीत येणार आहेत. याशिवाय शौचालयावर पाणी टाकी उपलब्ध करून देण्यासाठीही निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी साठवणीअभावी बंद असलेली शौचालये सुरू होणार आहेत.