अमरावती : परतीच्या पावसामुळे राज्यात शेती व फळपिकांचे नुकसान झाले, याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.
शेतकºयांच्या विविध समस्यांबाबत खासदार राणा यांनी राज्यपालांशी संवाद साधला व शेतकºयांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भातील शेतकºयांना खरीप पिकांच्या पेरणी ते कापणीसाठी एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च आला. मात्र, सततच्या पावसाने पिकांची वाट लागली. त्यामुळे विदर्भातील शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न नसल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे. शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी एकरी ५० हजारांची मदत देण्यासाठी राज्य शासनाला आदेशित करावे, अशी विनंती राज्यपालांना केल्याचे त्या म्हणाल्यात.