लाकडासह मिनी ट्रक जप्त, ११ आरोपी अटकेत
वरूड/ लोणी : रस्त्यावरची झाडे चोरीला जात असल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाने बेनोडा पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून पोलीस आणि बांधकाम विभागाने शोध सुरू केला असता, गुरुवारी पहाटे ६.३० वाजता लोणी फाटा ते पिंपळखुंटा रस्त्याच्या बाजूची झाडे चोरट्या मार्गाने कापून ट्रकमध्ये नेताना पोलिसांनी ११ लोकांना रंगेहाथ पकडले. यात लाकडे, कटर मशीन, दोर ट्रक जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले.
आरोपींमध्ये भीमराव काठोडे (५८), बाबाराव हरले (६५, दोन्ही रा. जरुड), सोमलाल वरखडे (५०), रूपेश भलावी (३२), रामचंद्र मरस्कोल्हे (३८ सर्व रा. शहापूर), मिथुलसिंग भावे (३०), संजय उईके (३५), राजेश भोवरवंशी (४४), चरणसिंग भावे (३८, रा. सर्व. वरूड, शंकरलाल धुर्वे (५७), माणिक मसराम (३५ दोन्ही रा. तिवसाघाट अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे अवैधरित्या रस्त्याच्या बाजूची झाडे कापून चोरून नेण्याचा गोरखधंदा करीत होते. याबाबत सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता एकनाथ तळेले यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून ठाणेदार मिलिंद सरकटे, जमादार दिलीप वासनकर, गजानन कडू, सचिन भोसले तसेच उपविभागीय अभियंता एकनाथ तळेले यांचे पथक गुरुवारच्या सकाळी सहा वाजता लोणी फाटा ते पिंपळखुंटा मार्गावर दबा धरून बसले. यावेळी मिनी ट्रक क्र. एमएच ३१ एम ४९२५ मध्ये अवैधरीत्या रस्त्याच्या काठावरील आडजात हिरवी झाडे इलेक्ट्रिक मशीनने कापून चोरट्या मार्गाने वाहनात टाकत होते. याचवेळी ११ जणांना पकडून ताब्यात घेतले. आरोपीसह मुद्देमाल मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला.
पान २ किंवा ३ साठी