हुक्का पार्लर प्रकरण : सहायक कामगार आयुक्तांचे पत्रलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हुक्का पार्लर व्यवसायाचे नोंदणीपत्र मिळविताना व्यावसायिकांनी कोणकोणत्या दस्तऐवजांची पूर्तता केली, हे पाहण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत महाआॅनलाईन वेबसाईटच्या पोर्टलला ‘ई-मेल’द्वारे पत्र पाठवून माहिती मागविली आहे. ‘अड्डा-२७’ व ‘कसबा कॅफे’चे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर दोन्ही व्यावसायिकांनी प्रमाणपत्राचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार दुकाने निरीक्षकांनी कोतवाली व गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. मात्र, दुकाने निरीक्षकांनी तक्रार नोंदविताना अपूर्ण दस्तऐवज सादर केल्याने पोलिसांनीही सहायक कामगार आयुक्त कार्यालयास पत्र पाठवून यादोन्ही व्यावसायिकांविरुद्ध सबळ पुरावे मागविले आहेत. शॉपअॅक्ट नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन असल्यामुळे यादोन्ही व्यावसायिकांनी महाआॅनलाईन वेबसाईटवरून अर्ज केले होते. त्यांनी कोणत्या दस्तऐवजाचा वापर करून कोणत्या व्यवसायासाठी नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले, ही माहिती प्राप्त करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत शुक्रवारी राज्य शासनाच्या अधिकृत महाआॅनलाईन वेब पोर्टलला ई-मेलद्वारे माहिती मागविली आहे. २४ तासांच्या आत माहिती कळविण्यात यावी, असे पत्रात नमूद आहे. शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या हुक्का पार्लर व्यावसायिकांनी कोणत्या दस्तऐवजांची पूर्तता करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. ही बाब पडताळून पाहिली जाईल. पोलिसांनी ती माहिती मागविली असून त्यासाठी महाआॅनलाईन वेबसाईटला पत्र पाठविण्यात येत आहे. - रा.भा.आडे, सहायक कामगार आयुक्त.
महाआॅनलाईनला विचारणा
By admin | Published: May 27, 2017 12:00 AM