संतोष ठाकूर
अचलपूर : तालुक्यातील पथ्रोट येथील संस्कृती महिला बचत गटाकडून संचालित स्वस्त धान्य दुकानाची तपासणी अचलपूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने केली. धान्य वाटपात अनेक अनियमितता आढळून आल्या तसेच धान्याचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे सिद्ध होताच या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करण्याची व अपहार झालेल्या धान्याची वसुली बाजारभावाने करण्याची शिफारस जिल्हा पुरवठा विभागांकडे करण्यात आली आहे.
अचलपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी शैलेश देशमुख यांनी चमूसमवेत रेशन दुकानाची आकस्मिक तपासणी केली. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. सदर स्वस्त धान्य दुकानात धान्य वेळेवर पोहचवूनसुद्धा दुकानदार दुकान उघडून धान्यवाटप करीत नसून, ते महिन्याच्या १५ ते २० तारखेत उघडण्यात येत होते, असे तपासणीदरम्यान आढळून आले
दुकानदार लाभार्थींना पावती देत नव्हता तसेच शासकीय दरापेक्षा जास्त पैसे घेत होता. शासनाच्या मोफत धान्याचे वाटप पैसे घेऊन करीत होता. नियमित धान्य वाटपात भेदभाव करीत होता. तपासणीदरम्यान ३९ क्विंटल गहू, ११ क्विंटल तांदूळ, ११ क्विंटल साखर, पाच क्विंटल चणा डाळ, १० क्विंटल मका एवढा धान्याचा अपहार झाल्याचे तपासणीदरम्यान सिद्ध झाले. यावेळी एकूण ४३ लाभार्थींचे बयाण नोंदविण्यात आले. प्रशासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांचे तपासणी अभियान राबविण्यात येत आहे.