लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वीज प्रशासनाच्या बदल्या व प्रशासकीय पदस्थापनेमध्ये कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायविरोधात ९ जुलैपासून महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर उपोषणास बसलेले निखिल तिखे यांनी १९ जुलैचा आपला नियोजित विवाह सोहळा याच ठिकाणी पार पाडण्याचा निर्धार केला. या अजब विवाहाची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने जोरदार तयारी सुरू केली आहे.महावितरणने बदल्या व प्रशासकीय पदस्थापनेत वीज कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात वर्कर्स फेडरेशनने ९ जुलैपासून येथील मुख्य अभियंता कार्यालय ‘ऊर्जा भवन’समोर निखिल तिखे, प्रशांत दंडाळे, मनोहर उईके, राजीव येडतकर, दीपाली ठाकरे, नरेंद्र वंजारी आदींचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश आहे. उपोषणाला नऊ दिवस होऊनही अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. अशातच उपोषणकर्त्यापैकी निखिल तिखे यांचा विवाह मुहूर्त आता दोन दिवसांवर आला आहे. उपोषणात सहभागी असल्याने ते घरी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आता वर निखील व वधु पूजा लंगडे यांचा विवाह दोन्ही पक्षांकडील मंडळींनी उपोषणस्थळीच लावण्याचा निर्णय घेतला.
१९ जुलै रोजी विवाह
उपोषणात सहभागी सहकाऱ्यांच्या उपस्थितीत १८ जुलैला दुपारी १.३० वाजता याचठिकाणी हळदीचा कार्यक्रम होणार आहे. १९ जुलै रोजी तिथीनुसार सकाळी ११.०२ वाजता विवाह लावला जाणार आहे. यावेळी महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर व सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख कार्यालयात उपस्थित राहतील. जिल्ह्याचे खासदार, आमदार, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी सर्व वीज कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष सी.एन. देशमुख, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य राजू सलामे, पंजाब कुºहेकर, महेश जाधव, विजय वावरकर, अमोल काकडे, विपीन रहाटे, नीलेश कदम, पवन कुºहाळे आदींनी केले आहे.