अंतिम वर्ष वगळता बॅकलॉग, एम.फिल. परीक्षा २२ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:19+5:302020-12-14T04:29:19+5:30
अमरावती : अंतिम वर्ष वगळता अन्य सत्राच्या बॅकलॉग तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून महाविद्यालय स्तरावर प्रारंभ होणार आहेत. ...
अमरावती : अंतिम वर्ष वगळता अन्य सत्राच्या बॅकलॉग तसेच एम.फिल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून महाविद्यालय स्तरावर प्रारंभ होणार आहेत. १५ ते २० डिसेंबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. बॅकलॉगचे सुमारे ९० हजार विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून नोंदणी झाली आहे.
बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा, प्रश्नपत्रिका, मू्ल्यांकन आदी बाबी महाविद्यालयांना कराव्या लागतील. २२ ते ३० डिसेंबर कालावधीत परीक्षांचे नियोजन करून गुण विद्यापीठात पाठवावे लागणार आहे. ही परीक्षा असाईनमेंट पद्धतीने होणार असून, एकूण चार प्रश्न विचारले जातील. चार प्रश्नापैकी विद्यार्थ्यांना
कमीत कमी दोन प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला १० गुण राहतील. पदवी, पदव्युत्तर
अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षा शक्यतो ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियाेजन करावे, अशा सूचना विद्यापीठाने ११ डिसेंबर रोजी पत्राद्धारे प्राचार्यांना केल्या आहेत.
--------------------
एम.फिल. परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्वारे होणार
एम.फिल. विद्यार्थांच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्वारे घेण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना तयार कराव्या लागतील. अभ्यासक्रमावर आधारित ४० प्रश्नाच्या विषयनिहाय प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागतील. ४० प्रश्नापैकी विद्यार्थ्यांना कोणतेही २० प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एक तासाचा अवधी मिळणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा वेळ अतिरिक्त दिला जाणार आहे. परीक्षा संपताच १५ दिवसात पेपर गोपनीय विभागात जमा करावे लागणार आहे.
---------------
कोट
कोरोना नियामवलींचे पालन करून महाविद्यालयांना परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. प्राचार्यांना पत्र पाठविले असून, ३० डिसेंबरपर्यंत परीक्षा आटोपून कॉलेजला गुण पाठवावे लागेल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.