अचलपूर तालुक्यात बिनधास्त दुकानदारांवर बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:26 AM2021-02-21T04:26:19+5:302021-02-21T04:26:19+5:30
तालुका पथक अॅक्टिव्ह, कांडली, पथ्रोट, परसापूर, सावळी दातुरा, वडगाव येथे कारवाई परतवाडा : अमरावती शहरापाठोपाठ परतवाडा, अचलपूर शहर व ...
तालुका पथक अॅक्टिव्ह, कांडली, पथ्रोट, परसापूर, सावळी दातुरा, वडगाव येथे कारवाई
परतवाडा : अमरावती शहरापाठोपाठ परतवाडा, अचलपूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे तालुकास्तरीय ग्रामीण पथकाने कारवाईचा धडाका चालविला आहे. कोरोना त्रिसूत्रीची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदार व नागरिकांना दंड ठोठावण्यात येत आहे. शुक्रवारी तालुक्यातील कांडली, परसापूर, पथ्रोट, वडगाव येथे कारवाई करण्यात आली.
कोविड १९ प्रतिबंधक तालुका पथकप्रमुख तथा अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, सहायक बीडीओ महादेव कासदेकर, ए.डी. वांगे, प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव, वरिष्ठ सहायक संजय भगत, राजू कारंजकर यांच्या पथकाने मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे याबाबत किराणा व्यवसाय, बार व इतर दुकानदारांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला.
बॉक्स
अनेक ठिकाणी ग्रामसेवक बेपत्ता
अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ग्रामपंचायतीमध्ये या पथकाला अनेक ठिकाणी ग्रामसेवक बेपत्ता आढळून आले. त्यामुळे पथकाने त्यांना उपस्थितीचे सक्त निर्देश दिले असून कारवाईचा इशारा दिला आहे.
---------