अमरावती : एक डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकारिणीची सभा बुधवारी यवतमाळ येथे अभ्यंकर कन्या विद्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानाहून बोलताना माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे म्हणाले, शिक्षकांच्या मूलभूत समस्या आजपर्यंत फक्त विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानेच सोडविल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही संघटना शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत आली आहे. त्याची जाणव शिक्षकांनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत कितीही उमेदवार असले तरी देखील प्रकाश काळबांडे यांचीच सरशी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेला प्रांतिक अध्यक्ष श्रावण बरडे, विभागीय कार्यवाह एम.डी. धनरे, प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, जिल्हाध्यक्ष अशफाक खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विमाशि संघाचे उमेदवार प्रकाश काळबांडे यांनी शिक्षकांच्या समस्यासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही यावेळी दिली. प्रांताध्यक्ष श्रावण बरडे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष अश्फाक खान यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना तन, मन व निष्ठेने काम करण्याचे आवाहन केले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना मिळवून दिलेले स्थैर्य, आर्थिक लाभ, सेवा संरक्षण, घातक शासननिर्णयाविरुद्ध केलेले कृतिशील संघर्ष यावर डायगव्हाणे यांनी प्रकाश टाकला. संघटनेने केलेल्या विकासात्मक कामांची माहिती त्यांनी दिली. आताचे आमदार शिक्षक व विद्यार्थी यांच्या हिताची कामे करण्यात अपयशी ठरले असल्याचे त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. शिक्षकांच्या भल्यासाठी निवडून गेलेल्या व्यक्तीने राजकीय पक्ष आणि प्रशासनाशी वेळोवेळी हातमिळवणी करून शिक्षक, विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर शासनाविरोधात संघर्षही केला नाही. शिक्षकांची दिशाभूल करून आर्थिक बळावर निवडणूक जिंकण्याचा अलीकडे व्यवसाय झाल्याचे दिसून येत आहे. जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करणे, अनुदानास पात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक वेतन अनुदानाचे टप्पे नियमित मंजूर करणे, निकषपात्र ठरलेल्या शाळांबाबत अनुदानाचे नियम शिथिल करून अनुदान मंजूर करणे, वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट मंजूर करणे या सर्व बाबी शिक्षकांच्या पदरात पाडून घेण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही एकच संघटना आजतागायत प्रामाणिपणे काम करत आली आहे आणि यापुढेही प्रामाणिकपणे ती काम करत राहील, अशी मी ग्वाही देतो. मतदारांनी इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता प्रकाश काळबांडे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन माजी आमदार डायगव्हाणे यांनी केले.
सभेला अडागळे, धात्रक, थोटे, राठोड, बुरले, रासमडगुदार, पाटील, मोरे, महाकुलकर, कनाके, जिरापुरे, खरोडे, बोढे, मुरखे, नरुले, गारघाटे, घाटे, अंदुरे, गोविंदवार, टोणे, पंकज राठोड, नारायण राठोड, पवन बन, दुधे, पुनवटकर, मेश्राम, हेडावू, मोहन देशमुख, श्रीकांत अंदुरकार, पंजाब चंद्रवंशी, मिलिंद जाधव, उमेद डोंगरे, लक्ष्मण मेद्राण आणि सर्व जिल्हा आणि तालुक्यांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यवाह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान शिक्षकांमध्ये जाणवणारा उत्साह उल्लेखनीय हाेता.