अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : ज्ञानगंगा अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या टी-१ सी-१ वाघाच्या शोधमोहिमेदरम्यान, २,१०० किलोमीटरचा प्रवास करीत गौताळा अभयारण्यात दाखल झालेल्या टी-३ सी-१ वाघाची माहिती पुढे आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघांना त्यांचे क्षेत्र कमी पडत आहे. त्यातच मागील काही वर्षात वाघांचे प्रजननही त्या क्षेत्रात वाढले आहे. त्यामुळे टिपेश्वरमधील वाघ त्या जंगलातून बाहेर पडत आहे. बाहेर पडलेल्या या वाघांना जोपर्यंत सुरक्षित जंगल मिळत नाही तोपर्यंत त्यांची भ्रमंती सुरूच आहे.
अशातच टिपेश्वरमधील टी-१ सी-१ वाघ वर्षभरापूर्वी ३ हजार १७ किलोमीटरचा प्रवास करीत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला. तो वॉकर वन ठरला. वर्षभराच्या वास्तव्यानंतर २०२१ मध्ये हा वॉकर वन ज्ञानगंगातून दिसेनासा झाला. या वाघाचा शोध वन्यजीव विभागाकडून युद्धस्तरावर घेतला जात आहे. वाघिणीच्या शोधात तो बाहेर पडला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पण याच शोधमोहिमेत औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यात ११ व १२ मार्च रोजी गस्ती दरम्यान वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आले. यावर त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले गेले. या ट्रॅप कॅमेऱ्यात पाऊलखुणा, आढळलेल्या वाघाचे छायाचित्र कैद झाले.
वन्यजीव अभ्यासक व अधिकारी-कर्मचारी आणि एनजीओंच्या निरीक्षणाअंती गौताळ्यात आढळून आलेला १५ मार्चला कॅमेऱ्यात कैद झालेला वाघ टी-३ सी-१ निघाला. टिपेश्वरला लागून असलेल्या पांढरकवडा प्रादेशिक वनविभागातील तो असल्याचे स्पष्ट केल्या गेले. पांढरकवडा येथे २०१८ मध्ये या टी-३ सी-१ वाघाचे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले होते. २०१८ मधील हे छायाचित्र गौताळ्यात १५ मार्च २०२१ ला मिळालेल्या छायाचित्रासोबत जुळले आहे. हा टी-३ सी-१ वाघ २१०० किलोमीटरचा प्रवास करीत यवतमाळ जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळ्यात दाखल झाल्यामुळे हा वाघ आता वॉकर टू ठरला आहे.
कोट
गौताळा अभयारण्यात ११ व १२ मार्चला टी ३ सी १ वाघाच्या पावलाचे ठसे मिळालेत. यानंतर लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये १५ मार्चला छायाचित्र मिळाले. हा वाघ गौताळ्यातील नाही. पाहुणा म्हणून दाखल या वाघाच्या सुरक्षिततेची आवश्यक ती सर्व काळजी घेतल्या जात आहे.
- विजय सातपुते, विभागीय वनअधिकारी (वज्यजीव) औरंगाबाद
कोट
ज्ञानगंगातून बाहेर पडलेला आणि दिसेनासा झालेल्या टी १ सी १ चे लोकेशन मिळालेले नाही. त्याच्या शोधार्थ लावल्या गेलेल्या १७० ट्रॅप कॅमेरे चेक केल्यानंतर काही माहिती हाती येऊ शकेल. २१ मार्च पर्यंत हे ट्रॅप कॅमेरे तपासले जाणार आहेत.
- एम.एन.खैरनार, विभागीय वनअधिकारी (वन्यजीव), अमरावती