बी.एड, बी.पीएड. प्रवेशासाठी शिक्षकांना ‘लक्ष्यांक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:30 AM2020-12-16T04:30:18+5:302020-12-16T04:30:18+5:30
अमरावती : गत काही वर्षांपासून शिक्षण (बी.एड.) आणि शारीरिक शिक्षण (बी.पीएड) महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही ...
अमरावती : गत काही वर्षांपासून शिक्षण (बी.एड.) आणि शारीरिक शिक्षण (बी.पीएड) महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही महाविद्यालये सुरू राहावी, यासाठी संस्थाचालक, प्राचार्यांकडून संबंधित शिक्षकांना विद्यार्थी प्रवेशाचे ‘लक्ष्यांक’ दिले जात आहे. आता शिक्षकांनी प्रवेशासाठी विद्यार्थी शोधमाेहिम चालविली आहे.
मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. तेंव्हापासून शाळा, महाविद्यालये बंद आहे. तर दुसरीकडे काही वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने हजारो बी.एड्, बी.पीएड्. पदवीधारक नोकरीच्या शोधात आहेत. उच्च शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी मिळत नसेल तर अशी पदवी प्राप्त करणे कुचकामी ठरणारी असल्याची भावना पदवीधारकांची आहे. रोजगाराची संधी नसल्याने अनेकांनी बी.एड, बी.पीएड. शिक्षण नको, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे अमरावती विभागातील अनुदानित व विनाअनुदानित बी.एड, बी.पीएड. महाविद्यालये प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. काही महाविद्यालये अनुदानित असल्याने पटावर विद्यार्थी संख्या दर्शवून ती सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मात्र, एनटीसीएने निकष, अटी कठोर केल्यामुळे यंदा संस्थाचालक, प्राचार्यांकडून शिक्षकांना प्रवेश असेल तर नोकरी सुरक्षित असा फतवा जारी केला आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रवेशासाठी विद्यार्थी शोधमोहीम चालविली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील श्री. स्वामी समर्थ शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बुलडाणा येथील कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, मलकापूर येथील दादासाहेब रमेशसिंह राजपूत शारीरिक शिक्षण महाविद्यालय व बी.के. पाटील शारीरिक शिक्षण महाविद्यालय ही चार बी.पीएड्. कॉलेज बंद झाली आहे.
-------------------------
विभागात अशी आहे कॉलेजची संख्या
बी.पीएड- ४६
एम.एड- ३
बी.पीएड- १८
एम.पीएड- ३
-------------------------
बी.एड, बी.पीएड. महाविद्यालयांत एका युनिटमध्ये ५० प्रवेश क्षमता असून, ती सुद्धा होत नाही. प्रवेशासाठी विद्यार्थी मिळविणे जिकरीचे काम झाले आहे. एनटीसीएच्या निकषानुसार चार बीपीएड कॉलेज बंद करण्यात आले आहे.
- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती