अमरावती : धारणी तालुक्यातील नागुढाणा येथील मृत कोंबड्यांत ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण होते किंवा कसे, याबाबतचा पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. मात्र, भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. दरम्यान, दक्षता म्हणून नागुढाण्यापासून १० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात सतर्क क्षेत्र व निरीक्षण क्षेत्र घोषित करून परिसरात सर्वेक्षणही सुरू केले आहे.
नागुढाणा येथील फार्मवर ४९५ कोंबड्या मृत झाल्याचे आढळले. त्याचे नमुने पुणे येथील राज्यस्तरीय प्रयोगशाळेसह भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेला (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसिजेस) पाठविण्यात आले आहेत. पुणे येथील संस्थेचा अहवाल ‘निगेटिव्ह’ असून, भोपाळचा अप्राप्त आहे. तथापि, सावधगिरी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून सतर्क व निरीक्षण क्षेत्र घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त एम.यु. गोहोत्रे यांनी दिली.
घाबरू नका, मात्र सतर्कता आवश्यकहिमाचलप्रदेश, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेशात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूसदृश स्थिती आढळून आलेली नाही. तथापि, आवश्यक सतर्कता घेतली जात आहे. पूर्वदक्षता म्हणून कुक्कुटपालकांनी फार्म व परिसराची जैवसुरक्षा राखण्याबाबत आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी यापूर्वीच जारी केले आहेत. त्याचप्रमाणे, तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समित्याही गठित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात कुठेही पक्षी मृत झाल्याचे आढळताच नियंत्रण कक्षाला तत्काळ कळवावे. मृत पक्ष्यांना कुणीही हात लावू नये व परस्पर विल्हेवाट लावू नये. ग्रामीण नागरिकांनी असे आढळल्यास तत्काळ ग्रामसेवकांना कळवावे. ग्रामअधिका-याने ही माहिती नजीकच्या पशुवैद्यकाला कळवणे बंधनकारक आहे.- एम. यु. गोहोत्रे,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त