मागणीची पूर्तता न होता सुटले भाजप तालुकाध्यक्षांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:35+5:302021-05-13T04:12:35+5:30
पब्लिसिटी स्टंटची चर्चा, राष्ट्रीय महामार्ग ‘जैसे थे’ सुमीत हरकूट चांदूर बाजार : शहरातून जाणारा ३५३ जे या राष्ट्रीय ...
पब्लिसिटी स्टंटची चर्चा, राष्ट्रीय महामार्ग ‘जैसे थे’
सुमीत हरकूट
चांदूर बाजार : शहरातून जाणारा ३५३ जे या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामांमध्ये राजकीय हस्तक्षेप, अरुंद रस्ता व नुकसानभरपाई या मुद्द्यांवर सुरू केलेले बेमुदत उपोषण अवघ्या २४ तासांत एकही मागणी पूर्ण न होतादेखील भाजप तालुकाध्यक्षांनी सोडले. यामुळे हे उपोषण केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चा शहरामध्ये जोर धरू लागली आहे.
शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे अरुंद झाला आहे. यामुळे महामार्गाचे चौपदीकरण करण्यात यावे तसेच या रस्त्याचा कडेला रोजगार करणाऱ्या नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करीत भाजपाचे तालुकाध्यक्ष मुरली माकोडे यांनी सोमवारी दुपारी १ वाजता बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांचा या उपोषणाला परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी भेटी देऊन समर्थन दर्शविले होते. या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न तालुकाध्यक्ष माकोडे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा रेटून धरला होता. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागातर्फे ११ मे रोजी उपोषणस्थळ भेट देण्यात आली आणि उपोषणाची ,सांगता झाली. मुरली मकोडे यांनी उपोषण मागणी पूर्ण न होताच मागे घेतले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने याप्रसंगी दिलेल्या लेखी माहितीनुसार, सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम हे करारनाम्यातील तरतुदीप्रमाणेच करण्यात येत आहे. हा रस्ता दहा मीटर रुंदीचाच होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडील या रस्त्याची चांदूर बाजार शहरातील रुंदी एकूण १६ मीटर एवढीच असल्याने चौपदरी रस्ता प्रस्तावित करण्यातच आला नव्हता. परंतु, गावाबाहेरून जाणारा वळण रस्ता या विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आला होता. भविष्यात वळण रस्त्याचे काम होणार असल्याने शहरातून होणारे बांधकाम हा राष्ट्रीय महामार्गाचा भाग असणार नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कडेला जमिनीचे भूसंपादन प्रस्तावित करण्यात आले नव्हते, अशी लेखी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने उपोषणकर्ते माकोडे याना सादर केली.
सहायक अभियंता अंकित कावरे यांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात ठाणेदार, कंत्राटदाराचे प्रतिनिधी यांच्यासमक्ष उपोषणपूर्वी ७ मे रोजीच सदर कामाबाबत मुरली माकोडे यांना संपूर्ण माहिती दिली होती. उपलब्ध असलेल्या १६ मीटर रुंदीत १० मीटरचा काँक्रीट रस्ता तसेच उर्वरित भागात दोन्ही कडेला पक्की गटारे व पेव्हरचे काम होणार आहे. यामुळे भाजप तालुकाध्यक्षांच्या मागण्या व उपोषण फोल ठरले.
एकंदरीत भाजप तालुकाध्यक्षांचे उपोषण केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. उपोषण सोडविण्याकरिता तहसीलदार धीरज स्तूल, ठाणेदार सुनील किनगे तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता उपस्थित होते.