अमरावती : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शनिवारी काळी गुढी उभारली. ४ मार्चपासून शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी अमरावती मुक्कामी महाप्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे मार्गदर्शक साहेबराव विधळे व मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात काळी गुढी उभारून शनिवारी कडक उपवास करून काळा गुढीपाडवा पाळला. होळीलादेखील हे उपोषणकर्ते याच मंडपात मागण्यांसाठी लढा देत होते.
२०१३ च्या कायद्यानुसार शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी एक महिन्यापासून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने ठोस तोडगा न काढल्याने आंदोलक शेतकरी आक्रमक झाले आहेत. २००६ मध्ये धरणाच्या प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला हा २०१३ च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना द्यावा, या प्रमुख मागणीसाठी विदर्भातील शेकडो शेतकरी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मागील एक महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. परंतु, आंदोलनाला एक महिना पूर्ण होत असतानादेखील राज्य सरकारकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन मंडपातच राज्य सरकारविरोधात काळी गुढी उभारून काळा गुढीपाडवा साजरा केला.