चांदूर रेल्वे : जय मातृभूमी क्रीडा व शिक्षण संस्था, युवक काँग्रेस, पाताळेश्वर देवस्थान यांच्यावतीने नववर्षाच्या प्रारंभी मांजरखेड कसबा येथील पाताळेश्वर देवस्थानात रक्तदान शिबिर व कोरोनायोद्ध्यांचा सत्कार पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वीरेंद्र जगताप होते. प्रमुख उपस्थिती आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, सरपंच दिलीप गुल्हाने, मातृभूमी संस्थेचे अध्यक्ष अशोक जयस्वाल, देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र देशमुख, नितीन गोंडाणे, वर्षा देशमुख, नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी यांची होती. प्रारंभी मुख्याधिकारी, पत्रकार, तलाठी, विद्युत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. २०२० हे वर्ष मोठ्या संकटाचे होते. आता २०२१ सर्वांसाठी आनंदाचे जावो, अशी सदिच्छा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. वीरेंद्र जगताप यांनी विरोधी पक्ष विविध प्रकारचे वक्तव्य करून संकटातील जनतेची दिशाभूल करीत असल्याचे मत व्यक्त केले. संचालन सुरेखा मेश्राम यांनी केले. प्रास्ताविकातून अशोक जयस्वाल यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती दिली. आभार प्रदर्शन सुमेर सरदार यांनी केले. सुरेश मेश्राम, विजय क्षीरसागर, अशोक देशमुख यांच्यासह उपसरपंच, सदस्य, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व मांजरखेड येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.