उद्यान बांधकामातील अनियमिततेवर बोट

By admin | Published: February 8, 2017 12:06 AM2017-02-08T00:06:52+5:302017-02-08T00:06:52+5:30

मनपाच्या बांधकाम विभागाने केलेल्या उद्यानविकासात अनियमितता झाल्याचे खळबळजनक निरीक्षण मनपाच्याच उद्यान विभागाने नोंदविले आहे.

Boat on irregularities in garden construction | उद्यान बांधकामातील अनियमिततेवर बोट

उद्यान बांधकामातील अनियमिततेवर बोट

Next

शीतयुद्ध : उद्यान अधीक्षकांचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र
प्रदीप भाकरे अमरावती
मनपाच्या बांधकाम विभागाने केलेल्या उद्यानविकासात अनियमितता झाल्याचे खळबळजनक निरीक्षण मनपाच्याच उद्यान विभागाने नोंदविले आहे. उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर यांनी यासंदर्भात कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांना पत्र पाठवून संबंधित उद्यानातील अनियमितता तपासण्याची सूचना केली आहे. या पत्राने बांधकाम आणि उद्यान विभागात शीतयुद्ध रंगण्याची दुश्चिन्हे आहेत. ३१ जानेवारीला हे पत्र पाठविण्यात आले असले तरी बांधकाम विभागामध्ये हे पत्र ४ फेब्रुवारीला पोहोचल्याची नोंद आहे. महापालिकेतील उद्यान विभागाने बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
सन २०१५-१६ वर्षातील १४ व्या वित्त आयोगातील २५ लाख १ हजार २३७ रूपयांच्या निधीतून शारदानगर प्रभागात उद्यान तयार करण्यात आले. हे काम मनपाच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आले. त्यामध्ये अनियमितता झाल्याचा अहवाल उद्यान अधीक्षकांना दिला आहे. उद्यानातील ‘हॉरी कल्टोन’ संबंधित कामांमध्ये बऱ्याच त्रुटी आढळून आल्याचे यापत्रात नमूद आहे. अंदाजपत्रकामध्ये लॉन ६०० चौरस मीटर असताना प्रत्यक्षात ५६८ चौरस मीटरमध्येच लॉन असणे, फ्लॉवर बेड ६० चौरस मीटरचे असताना प्रत्यक्षात ते ३०.९० चौरस मीटरमध्ये लावण्यात आल्याचे येवतीकरांनी केलेल्या तपासणीत नोंदविले गेले. ही अपूर्ण कामे पूर्ण करावी, अशी सूचना उद्यान विभागाकडून कार्यकारी अभियंत्यांना करण्यात आली आहे. ‘पार्क अ‍ॅन्ड गार्डन डीसीआर’च्या प्रत्यक्ष कामात खोदकाम खते व माती भरण्याचा अंतर्भाव असल्याची त्रुटी काढण्यात आली आहे. प्रत्यक्ष जागेवर फिलिंग दिसली नसल्याचे निरीक्षण येवतीकरांनी नोंदविले आहे. ‘ग्रीन जीम’च्या खरेदीमध्येही बांधकाम विभागाने घोळ घातल्याचा गंभीर आरोप यात करण्यात आला आहे. ‘ग्रीन जीम’ पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडून १० टक्के सुरक्षाकपात करण्यात आली नाही आणि संबंधिताला १२ टक्के ‘वॅट’ सुद्धा अधिक देण्यात आला. सोबतच वस्तुची दोन वर्षांची कोणतीही हमी घेण्यात आली नाही, असे निरीक्षण येवतीकर यांनी अधिकृत प्रशासकीय पत्रात नोंदविले आहे.शारदानगरातील उद्यानात झालेली अनियमितता तपासावी आणि त्रुटी दूर केल्यानंतरच ते उद्यान हस्तांतरित करुन घेण्यात येईल. याअनुषंगाने संबंधित कंत्राटदार व शाखा अभियंत्यांना आदेशित करावे, अशी सूचना या पत्रातून करण्यात आली आहे. पत्राचा सूर कुठेही विनंतीचा नाही. उद्यान पूर्णत्वास आल्यानंतर कंत्राटदाराला पुढील तीन महिने किंवा सौंदर्यीकरण होईपर्यंत निगा राखण्याचे कळवावे, अशी सूचना कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांना उद्यान अधीक्षकाकडून करण्यात आली आहे. येवतीकर यांनी पोतदार यांना कडक शब्दात पाठविलेल्या यापत्राने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उपायुक्तांचा चर्चेचा शेरा
उद्यान अधीक्षकाकडून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नावे पाठविलेल्या पत्राच्या प्रती आयुक्त आणि सामान्य उपायुक्तांना माहितीकरीता पाठविण्यात आल्या आहेत. यापत्रात उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे यांनी मूळ नस्ती व संबंधित कंत्राटदारासह तसेच मेजरमेंट बुकसह चर्चा करावी, असा शेरा दिला आहे. मात्र, निवडणुकीतील व्यस्ततेमुळे याविषयावरील चर्चा प्रलंबित आहे.

शारदानगर प्रभाग उद्यानातील अनियमिततेबाबत कार्यकारी अभियंत्याना कळविण्यात आले आहे. तसे पत्र त्यांना ३१ जानेवारीला देण्यात आले. मात्र, निवडणुकीतील व्यस्ततेमुळे याप्रकरणी चर्चा होऊ शकली नाही.
- प्रमोद येवतीकर,
उद्यान अधीक्षक, महापालिका

Web Title: Boat on irregularities in garden construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.