मंगरूळ दस्तगीर : मासे पकडण्यासाठी गेलेला इसम वरूड बगाजी येथील शुक्रवारी रात्री बोटीसह निम्न वर्धा प्रकल्पात बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह शोध व बचाव पथकाने शनिवारी सायंकाळी शोधून काढला.
दामोदर बापूराव नेवारे (५५, रा. चिंचपूर) असे या इसमाचे नाव आहे. चिंचपूर येथील लोअर वर्धा प्रकल्पात अंदाजे चार किमी परिसरात त्याच्यासह फिर्यादी गोवर्धन मेश्राम हे शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास मासे पकडण्याकरिता बोटीने गेले होते. मद्यधुंद अवस्थेतील दामोदर हा जेवण करून बोटीमध्ये झोपला. त्यावेळी गोवर्धन हा धरणाच्या पाण्यात जाळे लावत होता. हे काम आटोपल्यानंतर तो बोट उभी केल्याचे जागेवर आला असता तेथे दामोदर नव्हता आणि बोटही नव्हती. ही माहिती मिळताच रेस्क्यू टीमसह गावातील भोई समाजबांधव, पट्टीचे पोहणारे व पोलिसांच्या चमूने दामोदरचा शोध घेतला.
दरम्यान, ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला १४ ऑगस्टला मिळाली. जिल्हाधिकारी पवनीत कौर व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ चे समादेशक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या नेतृत्वात ४ वाजता चमू घटनास्थळी दाखल झाली. शोध बचाव पथकाने सायंकाळी ६ च्या सुमारास काठापासून पाच किमी अंतरावर मृतदेह शोधला. तो किनाऱ्यावर आणून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. रेस्क्यू टीममध्ये देवानंद भुजाडे, कौस्तुभ वैद्य, सचिन धरमकर, हेमंत सरकटे, भूषण वैद्य, गजानन वाडेकर, पवार, पंकज यावले, अजय आसोले, महेश मांदाळे यांचा समावेश असल्याची माहिती मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी दिली.