विद्यापीठात आचार्य पदवी प्रमाणपत्राचे शाखानिहाय होणार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:55+5:302021-06-11T04:09:55+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रमाणपत्राचे शाखानिहाय नियोजन केले आहे. १६ ते १९ जूनदरम्यान विद्यापीठात पीएच. ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रमाणपत्राचे शाखानिहाय नियोजन केले आहे. १६ ते १९ जूनदरम्यान विद्यापीठात पीएच. डी. प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार असून, पदवीकांक्षींना पत्राद्धारे कळविले आहे.
विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी आभासी पद्धतीने पार पडला. या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांची उपस्थिती होती. आता विद्यापीठाने आचार्य पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी नियोजन केले आहे. आचार्य पदवीकांक्षीना ओळखपत्र व पदवी शुल्क भरल्याची पावती सोबत आणावी लागेल. आचार्य पदवी शुल्क २०० रुपये विद्यापीठात जमा करणे आवश्यक असणार आहे. आचार्य पदवी प्रमाणपत्रात काही त्रुटी असल्यास त्याबाबत कार्यालयीन वेळेत विद्यापीठ परीक्षा विभागातील सहाय्यक कुलसचिव (सारणी) यांच्याशी संपर्क साधवा लागेल. प्रतिनिधीमार्फत पदवी हस्तांतरीत करावयाची असल्यास अधिकार सहपत्र व ओळखपत्रासह प्रतिनिधींना हजर राहावे लागणार आहे. आचार्य पदवी प्रमाणपत्राचे वितरण विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन केंद्र, परीक्षा विभागात करण्यात येणार आहे.
---------------
असे होईल आचार्य पदवी वितरण
- विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा : १६ जून, दुपारी १२ ते ४
- मानव्य विज्ञान विद्या शाखा : १७ जून, दुपारी १२ ते ४
- वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा: १८ जून, दुपारी १२ ते ४
-आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा : १९ जून, दुपारी १२ ते ४
-------------------
आचार्य पदवीकांक्षींना वितरणाबाबत कळविण्यात आले आहे. केंद्रीय मूल्यांकन विभागात ओळखपत्र, पदवीचे २०० रुपये शुल्क भरल्याची पावती पीएच .डी. पदवीधारकांना सोबत आणावी लागणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ