युवकाने धमकावल्यामुळेच बिल्डरच्या मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:32+5:302020-12-14T04:29:32+5:30
अमरावती : एका युवकाने मुलाला फोनवर मारण्याची धमकी दिल्याचे दडपण येऊन मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची तक्रार मृताच्या वडिलांनी ...
अमरावती : एका युवकाने मुलाला फोनवर मारण्याची धमकी दिल्याचे दडपण येऊन मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची तक्रार मृताच्या वडिलांनी गाडगेनगर ठाण्यात दिली. यासंदर्भात आरोपी व मृताच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग फोनमध्ये मिळाल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदविला.
भाविक मालू (रा. वरोरा), असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी शंकर अर्जुनदास भटेजा (४३, रा. रामपुरी कॅम्प) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी यांचा मुलगा आनंद भटेजा याने ८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी रामपुरी कॅम्प येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. तो व्हीआयटी कॉलेज वेल्लोर येथे बीईच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. लॉकडाऊनमुळे तो अमरावती येथे घरीच होता. ७ डिसेंबर रोजी फिर्यादी यांच्या लग्नाची वर्षगाठ होती. त्या निमित्ताने छोटेखानी घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम पुर्ण केल्यानंतर आनंद हा त्याच्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी त्याची आई खोलीत गेली असता, त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी मुलाच्या मोबाईलची पाहणी केली असता, त्याने मोबाईलमधील चॅट मृत्यूपुर्वी डिलिट केले होेते. मात्र, काही कॉल रेकॉर्डिंग आढळून आले. त्यात वरोरा येथे राहणारा भाविक मालू यास एका मुलीच्या कारणावरून आनंद हा भाविकला समजाविण्याचा प्रयत्न करीत होता, तर भाविक हा त्याला मारण्याची धमकी देत होता. आरोपीने आनंदला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. म्हणून त्याने भीतीपोटी आत्महत्या केली असावी, अशी तक्रार मृत आनंदच्या वडिलांनी गाडगेनगर ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्यवे गुन्हा नोंदविला. पुढील तपास पीएसआय प्रदीप होळगे करीत आहेत.