चांदूर रेल्वे : वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी, अशी मागणी चांदूर रेल्वे येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन केली आहे.
सध्या चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. परंतु, राज्यात लॉकडाऊन काळात उद्योग, व्यापार, व्यवसाय, शेती जोड धंदे पूर्णपणे बंद होते. अनेकांच्या नोकऱ्यासुद्धा यादरम्यान गेल्या. कोरोना काळातील वीजबिल १०० युनिटपर्यंत माफ केले जाईल, अशी घोषणा ऊजार्मंत्र्यांनी केली होती. परंतु त्या घोषणेची अंमलबजावणी केली नाही. याशिवाय शिवसेनेने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ३०० युनिटपर्यंत ३० टक्के वीजबिल माफ करण्याची घोषणा केली होती. तीसुद्धा पूर्ण केली नाही. महावितरण स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क असे अन्यायकारक कर वीजबिलात लावले आहे. तरी हे सर्व कर रद्द करावे व वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी, अशी मागणी विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे चांदूर रेल्वे तालुका अध्यक्ष अशोक हांडे, डॉ. सुरेंद्र खेरडे, संदीप देशमुख, नंदकिशोर देशमुख, साई जाधव, बाबाराव जाधव, दीपक शंभरकर, मनोहर बठे आदींनी चांदूर रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.