नरभक्षक वाघाने शेतमजुराला केले ठार, तीन दिवसांत दुसरा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:26 PM2018-10-23T22:26:17+5:302018-10-23T22:26:46+5:30
दोन दिवसांपूर्वी शेतक-याला ठार केल्यानंतर नरभक्षक वाघाने आणखी एका शेतमजुराची शिकार केली. या घटनेने धामणगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाघाला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या वनखात्याविरुद्ध मोठा रोष उफाळून आला आहे.
- मोहन राऊत
अमरावती - दोन दिवसांपूर्वी शेतक-याला ठार केल्यानंतर नरभक्षक वाघाने आणखी एका शेतमजुराची शिकार केली. या घटनेने धामणगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाघाला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या वनखात्याविरुद्ध मोठा रोष उफाळून आला आहे.
धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगी येथील मोरेश्वर बाबाराव वाळके (४५) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे़ मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर यांचा शुक्रवारी वाघाने बळी घेतल्यानंतर दुसºया दिवशी वनविभागाने बांधलेल्या जिवंत म्हशीला याच वाघाने फस्त केले. त्यानंतर शिदोडी येथील विनोद निस्ताने यांच्या घराबाहेर बांधलेल्या जर्सी कालवडीचे लचके तोडून हा नरभक्षक वाघ सोमवारी पहाटे अंजनसिंंगी किनईच्या जंगलात पसार झाला़ त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन पिंजºयांत म्हशी बांधून ठेवल्या होत्या. त्याच जंगलात चारा आणण्यासाठी गेलेल्या मोरेश्वर वाळके यांचे पायच शिल्लक ठेवलेले धड व धडावेगळे शीर मंगळवारी पोलिसांना आढळून आले. वनखात्याने जेथे म्हशी बांधून ठेवल्या होत्या, त्याच्या ५० फुटांवर नरभक्षक वाघाने या शेतमजुराची शिकार केली.
----------------
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
नागरिक चार दिवसांपासून वाघाच्या दहशतीत जगत आहेत. वनविभागाने कोणतीच उपाययोजना केली नाही़ मुख्य वनसंरक्षकांनी घटनास्थळी भेटही दिली नाही़ वनविभागाने खबरदारी बाळगली असती, तर दुसरा जीव गेला नसता़ नरभक्षक वाघाला जेरबंद करावे. मृताच्या नातेवाइकाला तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, दहा लाखांची मदत नगदी स्वरूपात द्यावी, अशा मागण्या मृताच्या कुटुंबीयांकडून करण्यात आल्या. त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता.
काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
नरभक्षक वाघाच्या भीतीपोटी सर्वच कामे ठप्प असून, शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.संबंधित वाघाला ठार मारा किंवा जेरबंद करा, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी आ. वीरेंद्र जगताप हे मंत्रालयाशी सतत संपर्कात आहेत.
९० वेळा नखे, पंजाचा मारा
वाघाने अत्यंत क्रूरतेने शिकार केली आहे. मोरेश्वर यांचे मुंडके धडावेगळे केले. त्यांच्या शरीरावर पंजा व दाताच्या ९० जखमा असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाºयाने दिला आहे. बकºयांसाठी चारा आणण्यासाठी साडेचार वाजता मोरेश्वर जंगलात गेले होते. ते हमालीचे काम करायचे.
शाळा-महाविद्यालये बंद
वाघाच्या भीतीमुळे धामणगाव व तिवसा तालुक्यांतील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. कुºहा येथील श्रीराम महाविद्यालयात सुरू असलेला विद्यापीठाचा पेपर पुढे ढकलला आहे. अंजनसिंगी येथे तब्बल दीडशे वनकर्मचाºयांचा ताफा असून, विशेष पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक कार्यान्वित आहे़
अधिका-यांची घटनास्थळी भेट
मोरेश्वर वाळके यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने चांदूर रेल्वेच्या महसूल उपविभागीय अधिकारी स्नेहल कनिचे, पोलीस उपविभागीय अधिकारी अविनाश शिंगटे, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार अभिजित नाईक, नायब तहसीलदार कृष्णा सूर्यवंशी, वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक अशोक कविटकर, वनक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नातेवाइकांसह काँग्रेसच्या पदाधिकाºयांची समजूत काढली.मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली. दुपारी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला.