मोर्शीत गुरांची तस्करी, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:41 AM2023-06-24T11:41:53+5:302023-06-24T11:43:11+5:30
मध्य प्रदेश सीमेवर कारवाई; २० गोवंशांची सुटका, आरोपींचे पलायन
मोर्शी (अमरावती) : अवैध गोवंश तस्करीच्या दोन प्रकरणांमध्ये मोर्शी पोलिसांनी शुक्रवारी दिवसभरात दोन वाहनांसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही घटनांमध्ये प्रत्येकी १० अशी २० जनावरे मुक्त करण्यात आली.
पोलिस सूत्रांनुसार, एमएच २७ बीएक्स ६४७७ क्रमांकाच्या वाहनातून दहा गोऱ्हे कत्तलीसाठी नेण्यात येत होते. मोर्शी पोलिसांना याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण वेरूळकर, हवालदार सुभाष वाघमारे, श्यामसिंह चुंगडा, संदीप वंजारी, सौरभ तायडे यांनी नागठाणा परिसरात धाड टाकली. १ लाख ४० हजारांची जनावरे आणि चार लाखांचे वाहन असा ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोर्शी पोलिसांनी मध्य प्रदेश सीमेवर हिवरखेड येथे बॅरिकेड्स लावून नाकाबंदी केली असता, २३ जून रोजी नजीकच्या रायपूर शिवारातून गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. सकाळी ११ वाजता एमएच ३२ क्यू ४९७५ क्रमांकाचे वाहन पकडून दहा बैल-गोऱ्हे दोरीने मुक्त केले.
दोन्ही प्रकरणांतील आरोपींनी पलायन केले, तर गोवंशाची सुटका करून त्यांना मोर्शी-अमरावती रोडवरील गौरक्षणात ठेवण्यात आले आहे.