सिमेंट रस्त्यावरील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 05:00 AM2022-03-16T05:00:00+5:302022-03-16T05:01:03+5:30
कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात दोन डझनांपेक्षा अधिक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त करण्यात आले; पण तरीही पार्किंगचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांकडे पाहिल्यानंतर ते गाड्या चालविण्यासाठी तयार कलेले रस्ते नसून गाड्या पार्किंगसाठी केलेली व्यवस्था आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून विचारला जाऊ लागला आहे. अमरावती शहरात वर्दळीच्या चौकांतून गेलेल्या रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांचे रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात महापालिकेच्या वाहनतळांची वाणवा आहे, त्यामुळे शहरातील सिमेंटचे रस्ते सध्या दुचाकींच्या पार्किंगसाठी सोयीचे ठरले आहेत. सिमेंटच्या रस्त्यांवर दुचाकींचे वाहनतळ उभे राहिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शहरातील दोन्ही उड्डाणपुलांमुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ही समस्या अजूनही कायम आहे. सबब, सिमेंट रस्त्यावरील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात दोन डझनांपेक्षा अधिक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त करण्यात आले; पण तरीही पार्किंगचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांकडे पाहिल्यानंतर ते गाड्या चालविण्यासाठी तयार कलेले रस्ते नसून गाड्या पार्किंगसाठी केलेली व्यवस्था आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून विचारला जाऊ लागला आहे.
अमरावती शहरात वर्दळीच्या चौकांतून गेलेल्या रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांचे रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. अशा पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्थेला अडचण होऊन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच शहरातील महत्त्वाच्या पार्किंगच्या काही जागा अतिक्रमितांनी गिळंकृत केल्या आहेत.
मालवीय चाैक ते जयस्तंभ चौक
मालवीय चौक ते जयस्तंभ चौकादरम्यान दुतर्फा सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. लहान-सहान गल्ल्या असलेल्या या मार्गावर अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. पार्किंग व्यवस्था नसल्याने जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली जातात. फूटपाथ देखील पार्किंग व रस्त्यावर आलेल्या दुकानातील साहित्याने व्यापला आहे. या भागात उड्डाणपुलाखाली पार्किंगसाठी जागा आहे. मात्र, तेथे दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहने लागतात.
श्याम चौक ते एसबीआय
जयस्तंभ चौकाकडून वा महापालिकेकडून श्याम चौकाकडे वळल्यास तेथील सिमेंट रस्त्याचा फूटपाथ अस्ताव्यस्त पार्किंगने गिळंकृत केल्याचे दिसून येते. समोरासमोर असलेल्या मिठाई प्रतिष्ठाननेदेखील रस्त्याचा मोठा भाग अनधिकृतपणे कवेत घेतला आहे. त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप आहे.
वाहने सुसाट
शहराची लोकसंख्या आजमितीस १० लाखांच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनदेखील हजारो लोक विविध कारणांसाठी शहरात येत असतात, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरील सिमेंट रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने लागत असल्याने पादचाऱ्यांना फूटपाथऐवजी रस्त्यावरून चालावे लागते.