१२ जूनपर्यत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:00+5:302021-06-11T04:10:00+5:30
अमरावती : जिल्ह्यात १२ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर वीज कोसळून होणारी जीवित-वित्तहानी ...
अमरावती : जिल्ह्यात १२ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर वीज कोसळून होणारी जीवित-वित्तहानी टाळण्याकरिता जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात माहिती दिली आहे. नागरिकांनी दक्षता घ्यायचे आवाहन त्यांनी गुरुवारी केले.
वादळी वारा, वीज चमकत असल्यास घरात असल्यास घराच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवा. घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून तीस मिनिटे घरातच राहा. घराबाहेर असल्यास सुरक्षित निवारा शोधून तिथे थांबा. ट्रॅक्टर, सायकल, बाईक, शेती अवजारे यांच्यापासून दूर राहा. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी थांबा. उघड्यावर असाल व सुरक्षित निवारा जवळपास नसेल, तर शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांत झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या व लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून दूर राहा. जंगलात असाल, तर दाट, लहान झाडाखाली व उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोलगट जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.
बॉक्स
वज्राघात झाल्यास ही काळजी घ्यावी
दुर्दैवाने वीज पडल्यास बाधित व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीमध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा, जेणेकरून हायपोथर्मियाचा (शरीराचे अतिकमी तापमान) धोका कमी होईल. इजा झालेल्या व्यक्तीचे श्वसन बंद झाल्यास तोंडावाटे पुनरुत्थान (माऊथ टू माऊथ) प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद झाल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदयगती सीपीआर करून सुरू ठेवावी.
बॉक्स
काय करू नये?
गडगडाटी वादळ आल्यास उंच जागांवर, टेकड्यांवर, मोकळ्या जागांवर, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विजेचे खांब, उघडी वाहने, पाणी आदी ठिकाणे टाळावीत. घरात असाल, तर फोन, मोबाईल, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज जोडणीला लावू नये. विजा चमकताना व गडगडाट असेल, तर वीज उपकरणांचा वापर टाळा. अशावेळी आंघोळ करणे, हात धुणे, भांडी किंवा कपडे धुणे टाळा. काँक्रीटच्या ठोस जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये.
बॉक्स
मेघगर्जनेचे वेळी झाडाजवळ उभे राहू नये
धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग, इलेक्ट्रिक मीटर आदी प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा. घराबाहेर असाल, तर मेघगर्जनेच्या वेळी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लोंबकळणाऱ्या विजेच्या किंवा कुठल्याही तारेपासून लांब राहा, असे आवाहन जिल्हा नियंत्रण कक्षाचे अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले आहे.