- अनिल कडू
अमरावती : दक्षता जनजागृती सप्ताहअंतर्गत बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबरला पार पडलेली ‘दप्तराविना शाळा’ विद्यार्थ्यांना खरा आनंद देऊन गेली. शिक्षणाचा कायदा आणि संयुक्त राष्ट्र हक्काच्या बाल संहितानुसार मुलांचा हक्क आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शिक्षण विभागांतर्गत शाळा शाळांमधून दक्षता जनजागृती सप्ताहास १४ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान वेगवेगळे उपक्रम शिक्षण विभागाने सुचविले आहेत.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शाळा स्तरावर १४ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळेत बोलाविण्यात आले होते. यात मुलांनी आनंददायी खेळात सहभाग घेतला. शाळेत फेरफटका मारला, तर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली या विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क आणि संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले गेले. या सप्ताहांतर्गत १८ नोव्हेंबरला मुलांना शाळाशाळांमध्ये हवे ते करू दिले जाणार आहे. यात मुलांना हवा तो खेळ खेळू दिले जाणार आहे. माती, चिखल, पाणी वापरून त्यांना कलाकृती तयार करता येणार आहेत. म्हणजेच १८ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मातीत खेळता येणार आहे.
१५ नोव्हेंबरला रंगोत्सव-
१५ नोव्हेंबरला मुलांसाठी शाळाशाळांमधून रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. १६ नोव्हेंबरला शिक्षक शाळेत अनियमित येणाºया मुलांच्या घरी भेट देणार आहेत. शिक्षक गावात फेरफटकाही मारणार आहेत. १७ नोव्हेंबरला पालकांना मार्गदर्शन, तर २० नोव्हेंबरला आनंद मेळाव्याने या सप्ताहाची सांगता होणार आहे. एकंदर दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर हा संपूर्ण आठवडा विद्यार्थ्यांकरीता आनंदी आनंद घेऊन आला आहे.