मिरची पावडर की भुसा? गव्हात कचरा, पाकिटावर आयएसओचा शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:05+5:302021-09-06T04:16:05+5:30
फोटो - जावरे ०५ पी मेळघाटात पोषण आहाराच्या मिरची पावडर की भुसा, गव्हात कचरा पाकिटावर आयएसओचा दर्जा; तिखट नव्हे ...
फोटो - जावरे ०५ पी
मेळघाटात पोषण आहाराच्या मिरची पावडर की भुसा, गव्हात कचरा
पाकिटावर आयएसओचा दर्जा; तिखट नव्हे पांचट,कडसर चव
● स्टिंग ऑपरेशन
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटात शासनातर्फे अंगणवाडी केंद्रामधून पोषण आहाराचे वाटप सीलबंद पाकिटातून केले जात आहे. किराणा साहित्यामध्ये वाटण्यात आलेल्या मिरची पावडर दर्जाहीन असून, भुशाच्या रंगाचे आणि कडसर चवीचे आहे, तर गव्हामध्ये कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याचे लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. आयएसओचा दर्जा असलेल्या पाकिटात निकृष्ट किराणा पाठविणाऱ्या तपासणी अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे ठरले आहे
कोरोनाकाळ पाहता अंगणवाडी केंद्रांमधून शिजवलेला आहार देणे बंद आहे. गर्भवती, स्तनदा मातांसह सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पाकीटबंद असलेल्या पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. हा आहार घरोघरी पोहचविला जात आहे. मात्र, त्यात अत्यंत निकृष्ट मिरची पावडर वाटप होत असल्याची गंभीर बाब ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली. यासंदर्भात चिखलदरा येथील सीडीपीओ भीमराव वानखडे यांच्याशी चर्चा केली असता, जिल्हास्तरीय बैठकीत तशी माहिती देण्यात आली असून लेखीसुद्धा कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
१५ हजारांवर लाभार्थी
चिखलदरा तालुक्यात स्तनदा व गर्भवती अशा २४०० महिला लाभार्थी आहेत. १३ हजारांच्या जवळपास सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थी पाहता, पंधरा हजारावर एकूण लाभार्थिसंख्या आहे. या सर्वांना महाराष्ट्र कंझ्यूमर फेडरेशन अंतर्गत धान्य आणि किराणा साहित्याचे वाटप केले जात आहे.
बॉक्स
मिरची पावडर की भुसा? दर्जा आयसओ
मूग किंवा मसूर डाळ, चणा, साखर, मीठ, हळद, मिरची पावडर तसेच शासनातर्फे गहू आणि तांदूळ असे वाटप मेळघाटातील अंगणवाडी केंद्रांमधून लाभार्थींना केले जाते. परंतु, यातील मिरची पावडर निकृष्ट दर्जाची असून त्याची चव पाणचट, कडसर, रंग भुशाचा आहे. पाकिटावर आरएमटी कंपनी नमूद असून त्याचा दर्जा आयएसओ असल्याचे ठळक लिहिले आहे. त्यामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचा मिरची पावडर कुठल्या अधिकाऱ्याने तपासून खाण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले, हे तपासण्याची वेळ आता आली आहे.
कोट
मिरची पावडरसंदर्भात तोंडी कळविण्यात आले होते. परंतु त्याबद्दल लेखी तक्रारसुद्धा जिल्हास्तरावर पाठविण्यात येत आहे.
- भीमराव वानखडे, सीडीपीओ, चिखलदरा