३०० स्कूल बसच्या परमीटवर गंडांतर
By admin | Published: June 13, 2016 11:59 PM2016-06-13T23:59:47+5:302016-06-13T23:59:47+5:30
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बस व व्हॅनची तपासणी मोहीम सुरु केली आहे.
आरटीओेंची धडक तपासणी : १५ जूनची ‘डेडलाईन’
अमरावती : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बस व व्हॅनची तपासणी मोहीम सुरु केली आहे. ही तपासणी मोहीम १५ जूनपर्यंत चालणार असून वाहन तपासणीकडे पाठ फिरविणाऱ्या तब्बल ३०० पेक्षा अधिक वाहनांचे परमीट रद्द होण्याची शक्यता आहे, तसे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शहरात ६३० बस व व्हॅन असून त्यातील ३३६ वाहनांचीच तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित ३०० वाहनधारकांनी त्यांची वाहने तपासणीसाठी अद्याप आणलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दरवर्षी आरटीओतर्फे ही मोहीम राबविली जाते. यंदा तर उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
३१ मे ही पुनर्तपासणीची डेडलाईन होती. मात्र, त्यात आता वाढ करण्यात आली असून १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व व्हॅनची फेरतपासणी शाळा सुरु होण्यापूर्वी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ३३६ वाहनांची तपासणी पूर्ण झाली आहे. १५ जूनपर्यंत फेरतपासणीची मुदत दिली असून त्यापूर्वी वाहन सादर न केल्यास संबंधितांचा परवाना निलंबित केला जाणार आहे. पुढे जाऊन संबंधीत स्कूल बस व व्हॅनचे परमीट रद्द करण्याची कारवाई यात प्रस्तावित आहे.
विद्यार्थी संख्येवर निर्बंध कोणाचा ?
सध्या स्कूल बस व व्हॅनच्या फेरतपासणीद्वारे उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला जात आहे. मात्र, या वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. व्हॅनमध्ये तर विद्यार्थी अक्षरश: कोंबले जातात. अपघात किंवा अप्रिय घटना टाळण्यासाठी स्कूल बस आणि व्हॅनमध्ये पुरेशा सुविधा आवश्यकच आहेत. मात्र, त्यावेळी विद्यार्थ्यांच्या दाटीवाटीच्या प्रवासावर कायमस्वरुपी तोडगा निघावा, अशी अपेक्षा पालकांची आहे.
या हव्यात सुविधा
विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी व्हॅन आणि स्कूल बससाठी राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. यात स्पिड गव्हर्नर, बे्रक, फर्स्ट एड बॉक्स, ईमर्जन्सी एक्झिट, वायपर आदी महत्त्वपूर्ण पैलू आहेत. व्हॅन आणि स्कूल बसमध्ये या सुविधा आहेत की नाही, यासाठी आरटीओकडून ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुट्टीच्या कालावधीत आणि शाळा सुरु होण्यापूर्वी ही फेरतपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. स्कूल बस आणि व्हॅनमध्ये अग्निरोधक यंत्रे, दप्तरे ठेवण्याची जागा, रॉड व अन्य सुविधा बंधनकारक आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारपर्यंत ३३६ वाहनाची फेरतपासणी करून घेतली आहे. उर्वरित वाहनधारकांनी १५ जूनपूर्वी तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे, अन्यथा वाहनाचे परमिट रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
- विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.