फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:31+5:302021-01-14T04:11:31+5:30

अमरावती : शहरातील गर्दीच्या चौकांत दर्शनी भागात मोठाले होर्डिंग्ज लावून फुकटची प्रसिद्धी मिळविण्याचा राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांचा नित्यक्रम झालेला आहे. ...

The city squints at free advertisers | फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप

फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप

Next

अमरावती : शहरातील गर्दीच्या चौकांत दर्शनी भागात मोठाले होर्डिंग्ज लावून फुकटची प्रसिद्धी मिळविण्याचा राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांचा नित्यक्रम झालेला आहे. कुणाचाही वाढदिवस, नियुक्ती झाल्यास आपण नेत्याच्या किती जवळचे हे दाखविण्यासाठी कार्यकर्तेदेखील होर्डिंग्जद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रकारामुळे शहराचा असा कुठलाच भाग मोकळा श्वास घेऊ शकत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण दिवसेंदिवस वाढत चालले असून, महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.शहरातील मुख्य राजकमल चौक, गांधी चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, पंचवटी चौक, चपराशीपुरा चौक, चांदणी चौक, पठाण चौक, राजापेठ, कठोरा नाका, इतवारा बाजार, शुक्रवार बाजार परिसरात विविध पक्षपदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक, नियुक्तीबाबत अभिनंदनाचे अनेक फलक, होर्डोंग्ज दर्शनी भागात लावले जातात. मात्र, काही दिवसांनी ते काढायला हवे असताना महिनोंगिणती ते फलक, होर्डिंग्ज तसेच राहतात. त्यातील काही फलकांचे तार तुटल्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. यामुळे अपघाताची घटना नाकारता येत नाही. मात्र, ज्यांनी ते फलक लावले त्यांना काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

प्रशासनाच्या डुलक्या

महापालिकेच्या कर विभागाद्वारा अशा फुकट्या जाहिरातदारांवर लोकसभा निवडणुकीदरम्यान कारवाई झाली होती. कालांतराने पुन्हा नवीन होर्डिंग्ज, फ्लेक्स लागले. पठाण चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या अर्धवट पिल्लरवरसुद्धा फ्लेक्स लागलेले आहेत. मात्र, बाजार परवाना विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

--

होर्डिंगच्या माध्यमातून महापालिकेला लाखोंची मिळकत

शहराचा विस्तार मोठा असून, विविध भागांत होर्डिंग लावले जातात. या माध्यमातून महापालिकेला दरवर्षी लाखो रुपये कर स्वरुपात प्राप्त होतात. मात्र, काही अनधिकृत होर्डिंगकडे अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

--

कोट

२०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान शहरातील अवैध होर्डिंग काढून संबंधितांवर कारवाई केली होती. त्यानंतरही कारवाया सुरूच आहेत. कोरोना काळात यासंदर्भात वसुली होऊ शकली नाही.

- गणेश चव्हाण,

बाजार परवाना विभाग

Web Title: The city squints at free advertisers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.