पोलिसांच्या अहवालात बाजार समिती संचालकांना क्लीन चिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:31+5:302020-12-24T04:13:31+5:30
अचलपूर बाजार समिती नोकरी भरती, के.एन.के.वर ताशेरे परतवाडा : अचलपूर बाजार समितीतील वादग्रस्त कर्मचारी भरती प्रकरणात अचलपूर पोलिसांनी ...
अचलपूर बाजार समिती नोकरी भरती, के.एन.के.वर ताशेरे
परतवाडा : अचलपूर बाजार समितीतील वादग्रस्त कर्मचारी भरती प्रकरणात अचलपूर पोलिसांनी चौकशी अहवालात क्लीन चिट दिली आहे. परंंतु, भरतिप्रक्रिया राबविणाऱ्या के.एन.के. टेक्नॉलॉजी प्रा.लि.च्या संचालकासह प्रकल्प संचालकावर ताशेरे ओढले आहेत.
बाजार समितीवर सहकार विभागाचे नियंत्रण आहे. सहकार विभागाकडून अधिकृत चौकशी होण्याची अपेक्षा तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चौकशी अहवाल सादर करणाऱ्या अचपलूर पोलिसांनी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. मात्र जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी ‘तुमचे तुम्ही बघा’ची भूमिका स्वीकारल्याचे त्यांच्या २१ ऑगस्टच्या पत्रावरुन दिसून येते. सरळ सेवा भरतिप्रक्रिया कृषिउत्पन्न बाजार समितीने के.एन.के. टेक्नॉलॉजी प्रा.लि. यांच्याशी करारनामा केला. प्रकरणातील आरोपी शिपाई व सहायक सचिव हे बाजार समितीचे अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यामुळे चौकशी, शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार तसेच संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई आपले स्तरावरून क्रमप्राप्त ठरत असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी २१ ऑगस्टच्या त्या पत्रात स्पष्ट केले.
खरे तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १२ ऑगस्टच्या पत्रामध्ये चौकशी अहवालाप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. सरळ सेवा भरती २०१९ च्या अनुषंगाने प्राप्त तक्रार अर्जांवर अचलपूरच्या ठाणेदारांनी चौकशी पूर्ण केली असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पत्रात म्हटले आहे.
बॉक्स
के.एन.के.वर ताशेरे
अचलपूर बाजार समितीतील भरतिप्रक्रिया-२०१९ चे संकेतस्थळ ३० जुलै २०१९ ला बंद झाले. ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ३० जुलै २०१९ होती. परंतु, सदर संकेत स्थळाला लता वाजेपेयी या उमेदवाराच्या परीक्षा शुल्काचा भरणा २ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आला. यामध्ये के.एन.के. टेक्नॉलॉजी प्रा.लि. चा संचालक योगेश खंडारे व प्रकल्प संचालक गौरव वैद्य, बाजार समितीचा सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला आणि उमेदवार लता वाजपेयी प्रथमदर्शनी सक्रिय सहभागी असल्याचे दिसून येते, असे अचलपूर पोलिसांनी चौकशी अहवालात म्हटले आहे.
बॉक्स
पात्रता यादी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याच्या ३० जुलै २०१९ या अंतिम दिनांकानंतर दुसऱ्याच दिवशी पात्रता यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. मात्र, परीक्षा शुल्क भरणाऱ्यांची यादी ८ ऑगस्ट २०१९ ला के.एन.के. टेक्नॉलॉजी प्रा.लि. ला पुरविण्यात आली. या यादीत उमेदवार लता वाजपेयी यांनी ३० जुलैनंतर २ ऑगस्टला भरल्याचे स्पष्ट नमूद असल्याचेही अचलपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.