स्वच्छ सर्वेक्षणाचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’
By Admin | Published: February 7, 2017 12:08 AM2017-02-07T00:08:51+5:302017-02-07T00:08:51+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे.
आज पुनर्तपासणी : गुणांकनावर होणार शिक्कामोर्तब
अमरावती : स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे. क्यूसीआयचे पथक सकाळी महापालिकेत पोहोचणार आहेत. या पथकाकडून होणाऱ्या पुनर्तपासणीच्या अहवालावर अमरावती महापालिकेचे गुणांकन ठरणार आहे. सोमवारी दुपारी याबाबत ‘क्यूसीआय’कडून अतिरिक्त आयुक्तांना मोबाईल संदेश मिळाला असून पुनर्तपासणीच्या पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे. मंगळवारी हे ‘इव्हॅॅल्यूशन’ होणार आहे.
स्वच्छ भारत मिशनमधील स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत देशातील ५०० शहरांमध्ये ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’कडून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. २००० गुणांच्या स्वच्छताविषयक स्पर्धेमध्ये शहरांचे गुणांकन ठरविण्यासाठी एका खासगी कंपनीच्या ‘असेसर्स’कडून तपासणी करण्यात आली. त्या अनुषंगाने क्यूसीआयने नेमलेल्या चारूदत्त पाठक, गोविंद घिमिरे आणि विजय जोशी या पथकाने १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती शहराचे स्वच्छताविषयक पाहणी केली. चारूदत्त पाठक यांनी महापालिकेत बसून महापालिकेचे दस्तऐवज तपासले. घिमिरे आणि जोशींनी ‘स्पॉट व्हिजीट’ करत स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी केली. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाटीच्यासंदर्भात २००० गुणांचीही तपासणी करण्यात आली आणि महापालिकेचा जीव भांड्यात पडला. क्यूसीआय पथकाच्या सर्वेक्षणावेळी यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. स्वच्छताविषयक सर्वच डाटावर पाठक यांनी समाधान व्यक्त केल्याने पहिल्या २० शहरांमध्ये येणाऱ्या महापालिकेच्या आशा या समाधानातून पल्लवित झाल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा क्यूसीआयचे पथक एक दिवसासाठी पुनर्तपासणी करण्यात येत असल्याने अतिरिक्त आयुक्त शेटे आणि त्यांची टीम कामाला लागली आहे. शेटे यांच्यानुसार, मंगळवारी येणारे क्यूसीआयचे ‘असेसर’ १७ ते १९ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या सर्वेक्षणवजा तपासणीचेच क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहेत. (प्रतिनिधी)
लाचखोरीचा संदर्भ
जोशी आणि घिमिरे यांचा समावेश असलेले क्यूसीआयचे एक पथक औरंगाबाद महापालिकेत १ लाख ७० हजारांची लाच घेताना ‘एसीबी’ने पकडले होते. अन्य ठिकाणी तर असा प्रकार केला नाही ना? आणि केला असेल, तर त्या शहराच्या सर्वेक्षणाची वास्तविकता काय? हे तपासण्यासाठी पुन्हा एकदा अमरावती महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण होत आहे की काय, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. अमरावती महापालिकेने या पथकाची उत्तम बडदास्त राखली होती, हे येथे विशेष उल्लेखनीय.