नांदगाव खंडेश्वर : शिवणी रसुलापूर येथील पंतप्रधान आवास योजनेतील प्रपत्र ब मधील पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर व नायब तहसीलदार देवेंद्र वासनिक, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठलराव जाधव, विस्तार अधिकारी संदीप देशमुख व सचिन रिठे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ई-क्लासमधून त्यांना जागा उपलब्ध करण्याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
प्रपत्र ब मधील अनेक लाभार्थी २० वर्षांपासून शासकीय ई-क्लास जमिनीवर राहत आहेत. शासनाने सर्वांसाठी घरे २०२२ या योजनेंतर्गत प्रपत्र ब मधील लाभार्थ्यांना घरकुल देण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत येथील लाभार्थी डावलल्याचे उपोषणकर्त्यांची म्हणणे होते. २० वर्षांपासून सदर ई-क्लास जागेवर राहत असल्याने तेथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याची मागणी लाभार्थिंनी करून उपोषणाला सुरुवात केली होती. शुक्रवारी पंचायत समिती प्रशासनाने उपोषणकर्त्यांची मागणी मान्य करून सदर जागेबाबत पाठपुरावा करण्याचे मान्य केले. उपोषण करणाऱ्यांमध्ये लिला उपरीकर, इंदिरा शेंडे, राधा सळसळे, रंजना मेश्राम, अशोक शेंडे व इतर गावकरी सहभागी झाले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन प्रशासनाला उपोषणकर्त्यांच्या मागण्या मांडल्या. यावेळी विनोद तरेकर, माधव ढोके, सोनाली वैद्य, चित्रा वंजारी बाबाराव इंगळे, संजय मंडवधरे, सुनील मेटकर, सचिन रिठे, भानुदास मंदुरकर कोकीळा ढोके, अंकुश वैद्य यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
-------------