तूरडाळ खरेदीच्या सक्तीमुळे ग्राहकांची कोंडी
By admin | Published: September 27, 2016 12:19 AM2016-09-27T00:19:29+5:302016-09-27T00:19:29+5:30
बाजारपेठेत तूरडाळीचे भाव वाढल्याने ८ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार गरिबांना स्वस्तात तूरडाळ मिळण्याच्या ...
रेशन दुकानदारही अडचणीत : दरांमधील तफावत भोवतेय
मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर
बाजारपेठेत तूरडाळीचे भाव वाढल्याने ८ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार गरिबांना स्वस्तात तूरडाळ मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून तूरडाळ खरेदी करण्यासंदर्भात परिपत्रक काढले. बाजारपेठेतील तूरडाळीच्या दरात व स्वस्त धान्य दुकानातील दरातील तफावतीमुळे शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ विक्रीस ठेवावीच, असे फर्मान सोडले. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांची पंचाईत झाली.
बाजारपेठेत तूरडाळ ९५ रुपये किलो व स्वस्त धान्य दुकानात १०३ रुपये किलो असल्याने बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून डाळ घेणे परवडत नाही. परंतु तूरडाळ घेतली तरच स्वस्त धान्य मिळेल, अशी सक्ती स्वस्त धान्य दुकानदार करीत आहे! त्यामुळे बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यात एकूण १३४ शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे. त्याद्वारे तालुक्यातील हजारो बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना धान्याची शासकीय योजना कार्यान्वित आहे. परंतु शासनाच्या तुघलकी निर्णयाने जर गरिबांवर उपासमारीची वेळ येत असेल तर मग शासकीय योजनांचा फायदा काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ विक्रीस ठेवावीच लागेल, या पुरवठा विभागाच्या तोंडी आदेशाची स्वस्त धान्य दुकानदारांना अंमलबजावणी करावी लागत आहे. परंतु दर बाजारापेक्षा अधिक असल्याने स्वस्त धान्य दुकानदार व कार्डधारकांमध्ये वाद होत आहेत. स्वस्त धान्य दुकानदाराने तूरडाळीचे वाटप न केल्यास त्याचा फटका दुकानदाराला सोसावा लागतो. त्यामुळे एकीकडे प्रशासनाचा दबाव, तर दुसरीकडे ग्राहकांशी वाद अशी दुहेरी कोंडी स्वस्त धान्य दुकानदाराची झाली आहे. अशा स्थितीत शासनाने तूरडाळीचे भाव बाजारभावापेक्षा कमी करणे गरजेचे आहे. अन्यथा धान्य दुकानदार व कार्डधारकांमध्ये वाद पेटरणार आहे
तूरडाळीची बाजारपेठेपेक्षा स्वस्त धान्य दुकानात अधिक दराने विक्री होत आहे. त्यामुळे कार्डधारक व स्वस्त धान्य दुकानदारांत सतत वाद होत आहे. तूरडाळीचा पुरवठा करण्यात येऊ नये, असे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला दिले आहे. अद्याप यावर तोडगा न निघाल्याने पेच कायम आहे.
- विनोद कडू, सचिव,
स्वस्त धान्य दुकानदार संघटना
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागांतर्गत तालुक्याच्या नियमानुसार जेवढा धान्याचा पुरवठा मंजूर होतो तेवढेच धान्य दुकानदारास वितरित केले जाते. जिल्हा पुरवठा विभागामार्फत पाठविलेलाच साठा तालुक्यातील १३४ दुकानदारांना दिला जातोे.
- गजानन भेंडेकर,
तालुका पुरवठा निरीक्षक