रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणी गायब, केवळ ‘थर्मल स्क्रिनिंग’नंतर प्रवाशांचे ‘र्ईन-आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:11 AM2020-12-26T04:11:17+5:302020-12-26T04:11:17+5:30
बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशाकडून संक्रमणाचा धोका, रेल्वे गाड्यांतून येणारे प्रवासी बिनधास्त अमरावती : कोरोना नवे रूप घेऊन येणार असल्याचे संकेत ...
बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशाकडून संक्रमणाचा धोका, रेल्वे गाड्यांतून येणारे प्रवासी बिनधास्त
अमरावती : कोरोना नवे रूप घेऊन येणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्धारावर ये- जा करणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी आवश्यक आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकावर थातूरमातूर ‘थर्मल स्क्रिनिंग’ करण्यात येत आहे. काही प्रवासी ही चाचणीसुद्धा न करता आवागमन करीत आहे. मात्र, हा सर्व प्रकार रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस उघड्या डोळ्यांनी बघत आहे.
राज्य आणि राज्याबाहेर ये-जा करण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकाहून सर्वाधिक गाड्या धावत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. मात्र, गत दोन महिन्यांपासून रेल्वे स्थानकावर कोरोना तपासणी गायब झाल्याचे चित्र आहे. दिवाळीनंतर रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशातच कोरोना चाचणी होत नसल्याने जिल्ह्यात बाहेर गावाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांपासून संसर्गाचा धोका बळावला आहे. रेल्वे स्थानकावर महापालिका व मलेरिया विभागाची चमू प्रवाशांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’ करीत आहे. बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना अवघ्या दोन ते तीन मिनिटात तापमान तपासून बाहेरील रस्ता दाखवला जात आहे. परिणामी कोरोना चाचणी होत नसल्याने रेल्वे प्रवाशांची अलीकडे बल्ले बल्ले आहे.
------------------------------
कोरोना चाचणीसाठी ना टेबल, ना कर्मचारी
अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी पथक गायब झाले आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात टेबल ठेवण्यात आला आहे. परंतु, येथे कोरोना चाचणी होत नाही. केवळ ‘थर्मल स्क्रिनिंग’ करुन प्रवाशांना सोडले जाते. त्यामुळे संसर्ग कसा रोखणार, हा बिकट प्रश्न आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाने बाहेरगावाहून येणाºया रेल्वे प्रवाशामार्फत कोरोना संसर्ग येण्याची दाट शक्यता आहे.
--------------------
दोन ते तीन मिनिटांतच प्रवासी मुक्त
रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी होत नाही. त्यामुळे ‘थर्मल स्क्रिनिंग’ होताच दोन ते तीन मिनिटांतच रेल्वे प्रवाशांची तपासणी होऊन ते मुक्त होत असल्याचे वास्तव आहे. कोरोना चाचणीची भानगड नाही. त्यामुळे प्रवाशांचा फारसा वेळ जात नाही. हात किंवा कपाळावर तापमान तपासून पुढे प्रवास करता येत असल्याचे वास्तव आहे.
----------------------------
दररोज येणारे प्रवासी-२५००
येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या- ४०
---------------------------
कोट
जळगाव येथून मुंबई -हावडा शालीमार एक्सप्रेसने शुक्रवारी आलो. प्रवाशाला निघताना अगोदर कोरोना चाचणी केली होती, तसे प्रमाणपत्र सोबत आहे. मात्र, तसे काही घडले नाही.
- प्रशांत शिरभाते, प्रवासी
---------------------
कोट
गीताजंली एक्स्प्रेसने भोपाळ येथून आलोे. बहिणीकडे कामानिमित्त गेले होते. सोबत आई व दोन मुले होते. कोरोना तपासणी करूनच निघालो, पण बडनेरा रेल्वे स्थानकावरून बाहेर पडताना सुरक्षा रक्षक, रेल्वे कर्मचाऱ्यांनी विचारणा केली नाही.
- संध्या खांडेकर, प्रवासी